अधिकाधिक नामजप करण्याची ओढ असलेला आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला निपाणी, बेळगाव येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

निपाणी, बेळगाव येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विष्णु पट्टणशेट्टी याने आतापर्यंत विविध देवतांचे नामजप नियमितपणे लिहिले आहेत. विष्णूने नामजप लिहिण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याचे वडील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना त्याच्यामध्ये जाणवलेले पालट आणि त्यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

कु. विष्णु पट्टणशेट्टी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने पाठकोर्‍या कागदांवर नामजप छापून विष्णूकडून गिरवून घेण्याविषयी कल्पना सुचणे

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी

१ अ. नामजपाचे कागद पाहून विष्णूला आनंद होणे आणि त्याने लगेच पेन्सिल घेऊन नामजप गिरवायला आरंभ करणे : ‘काही मासांपासून मी माझा मुलगा ‘कु. विष्णूची साधना होण्यासाठी त्याच्यावर कसे संस्कार करायला हवेत ?’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करत होतो. सप्टेंबर २०२० मध्ये गुरुस्मरण करत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सूक्ष्मातून सुचवले, ‘कु. विष्णूकडून प्रतिदिन किमान एक पान नामजप लिहून घे.’ त्यानुसार मी पाठकोर्‍या कागदांवर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप छापून आणला. ते कागद पाहून विष्णूला पुष्कळ आनंद झाला. त्याने लगेच पेन्सिल घेऊन नामजप गिरवायला आरंभ केला.

१ आ. विष्णूने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप १११ पाने लिहून पूर्ण करणे : ६.११.२०२० या दिवशी विष्णूने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप लिहिण्यास आरंभ केला. तो प्रतिदिन १ पान किंवा कधी २ – ३ पानेही नामजप लिहित असे. या पद्धतीने विष्णूने १११ पाने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप लिहिला. विष्णूने एकूण १ सहस्र १११ वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप लिहिला.

१ इ. कु. विष्णूचा नामजप एकादशीच्या दिवशीच लिहून पूर्ण होणे आणि विष्णूची जन्मतिथीही एकादशीच असल्याने ‘त्या दिवशी नामजप लिहून पूर्ण होणे’, ही अनुभूती असणे : ६.६.२०२१ या दिवशी विष्णूने नामजपाचे शेवटचे पान गिरवले. त्या दिवशी अपरा एकादशी होती. विष्णूची जन्मतिथीही भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशी (परिवर्तिनी एकादशी) आहे. त्यामुळे ‘एकादशीच्या दिवशीच नामजप लिहून पूर्ण होणे’, हा भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृपाशीर्वाद आहे’, असे आम्हाला वाटले.

१ ई. कु. विष्णूने नामजप लिहिलेले कागद आणि नामजप लिहिण्यासाठी वापरलेले साहित्य यांची भावपूर्ण पूजा करणे : १११ पाने नामजप लिहून पूर्ण झाल्यानंतर विष्णूने नामजप लिहिलेल्या कागदांची पूजा करून ते भावपूर्णरित्या श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले, तसेच नामजप लिहिण्यासाठी वापरलेली पेन्सिल, ‘शार्पनर’ (पेन्सिलला टोक करण्याचे साधन) आणि खोडरबर यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचीही भावपूर्ण पूजा केली.

२. कु. विष्णूने नामजप लिहिण्यास प्रारंभ केल्यापासून त्याच्यात जाणवलेले पालट

नामजप लिहिलेल्या कागदांची पूजा करतांना कु. विष्णु पट्टणशेट्टी

२ अ. प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार करणे : विष्णु प्रतिदिन सकाळी उठल्यावर प्रथम श्रीकृष्णाला प्रार्थना करतो. त्यानंतर तो आम्हाला (आई-वडिलांना) नमस्कार करतो.

२ आ. आई-वडिलांना घरकामात साहाय्य करणे आणि त्यांनी सांगितलेले सर्व ऐकणे : विष्णु आम्हाला घरातील सर्व कामांमध्ये साहाय्य करतो. तो कोणतेही काम करण्यास नकार देत नाही. तो आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतो. तो रात्री झोपण्यापूर्वी खेळणी आणि वस्तू नीट आवरून ठेवतो. तो प्रत्येक गोष्ट नीटनेटकेपणाने करतो. विष्णूचा हट्टीपणा अल्प झाला असून तो शांत आणि समजूतदार झाला आहे.

२ इ. विष्णूला कधी झोप येत नसल्यास तो लगेच निद्रादेवीला प्रार्थना करतो.

२ ई. नातेवाइकांनाही विष्णूतील सात्त्विकतेची जाणीव होणे : आमच्या अनेक नातेवाइकांनीही आम्हाला सांगितले, ‘‘विष्णूकडे पाहून एक वेगळेच तेज आणि सात्त्विकता जाणवते. तो जिथे असेल तेथील वातावरण आनंदी जाणवते.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी विष्णूने ‘श्री गुरवे नमः ।’ हा नामजप करणे

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव होता. त्या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करत होतो. त्या वेळी विष्णूने ‘श्री गुरवे नमः ।’ हा नामजप करण्यास चालू केले.

४. आप्पाची वाडी येथील हालसिद्धनाथ यांच्या मंदिरात गेल्यावर विष्णूने ‘श्री हालसिद्धनाथाय नमः ।’ हा नामजप करणे

१८.५.२०२१ या दिवशी आम्ही आप्पाची वाडी येथील हालसिद्धनाथांच्या मंदिरात गेलो होतो. तिथे गेल्यावर विष्णूने मला विचारले, ‘‘हालसिद्धनाथ महाराज यांचा जप कसा करायचा ?’’ त्या वेळी मी त्याला सांगितले, ‘‘श्री हालसिद्धनाथाय नमः ।’’, असा नामजप करू शकतोस. त्याप्रमाणे विष्णूने लगेच नामजप करण्यास प्रारंभ केला, तसेच तो मंदिर परिसरातील हालसिद्धनाथांची छायाचित्रे, मंदिराच्या परिसरातील अश्व, समाधीस्थान आणि अन्य वस्तू यांना भावपूर्ण नमस्कार करत होता.

५. विष्णूने ६.६.२०२१ या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप लिहून पूर्ण केला. त्यानंतर ८.६.२०२१ या दिवसापासून विष्णु ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लिहीत आहे.

६. अनुभूती

६ अ. कुटुंबातील सर्वांना कोरोनाची बाधा होणे; मात्र विष्णु आमच्या संपर्कात असूनही त्याला कोणताही त्रास न होणे : ऑगस्ट २०२० मध्ये सौ. मीनल (विष्णूची आई) हिला कोरोनाची बाधा झाली होती, तसेच मार्च २०२१ मध्ये माझ्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती; मात्र आम्हा सर्वांच्या संपर्कात असूनही विष्णूला कोणताही त्रास झाला नाही. त्या वेळी ‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव विष्णूचे रक्षण करत आहेत’, असे मला वाटले.

७. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव, तुम्ही पावलोपावली आमच्या समवेत आहात’, याचे आम्हाला सतत स्मरण राहू दे. ‘हे गुरुदेवा, तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावर असाच निरंतर राहू दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी (कु. विष्णूचे वडील), निपाणी, बेळगाव, कर्नाटक (१०.६.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक