ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयीचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेला संशोधनात्मक प्रयोग
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !
२२.२.२०२२ या दिवशी ‘ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रयोग घेण्यात आले. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. प्रदीप चिटणीस व्यासपिठावर आल्यावर त्यांचे गायन चालू होण्यापूर्वी
‘श्री. चिटणीसकाका व्यासपिठावर आल्यावर साधकांना आध्यात्मिक लाभ होऊ लागला’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी गायन चालूही केले नव्हते. त्यांच्या अस्तित्वानेच साधकांना आध्यात्मिक स्तरावरील चैतन्य मिळू लागले.
२. श्री. प्रदीप चिटणीस यांनी सप्त स्वरांचे गायन चालू केल्यावर साधकांवर झालेले परिणाम
२ अ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘शुद्ध स्वर’ (टीप १) गायल्यावर साधकांवर झालेले परिणाम
टीप १ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच (त्यांच्या मूळ कंपनस्थानी (frequency ला)) असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात.
१. काकांनी सगळे शुद्ध स्वर म्हटले. त्या वेळी बर्याच साधकांना त्रास देणार्या सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींना त्रास होऊ लागला. त्यामुळे साधकांमधील त्रासदायक शक्ती लवकर न्यून झाली.
२. काकांनी हेच स्वर जलद गतीने म्हटल्यावर त्यांतून अधिक मारक शक्ती प्रक्षेपित झाली. साधकांना हे स्वर तारक-मारक स्वरूपाचे जाणवले. काकांनी म्हटलेल्या या स्वरांमुळे साधकांना त्रासदायक शक्तीचे बाह्य आवरण लवकर दूर झाल्याचे जाणवले.
‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष
आध्यत्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा ६० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढली.
२ आ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘कोमल स्वर’ (टीप २) गायल्यावर साधकांवर झालेला परिणाम
टीप २ – जे स्वर आपली मूळ जागा सोडून अल्प उंचीवर येतात; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक उंचीवर असतात, त्यांना ‘कोमल स्वर’ असे म्हणतात.
१. श्री. चिटणीसकाकांनी कोमल स्वर गायल्यावर काही वेळाने साधकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींना त्रास होऊ लागला.
२. हे स्वर अधिक खोलवर जात असल्याचे साधकांना जाणवत होते. ‘या स्वरांनी अंतर्शुद्धी होत आहे’, असे साधकांच्या लक्षात आले.
३. हे स्वर निर्गुण असल्याचे मला जाणवले.
‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष
आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा ७० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा अनुमाने तिपटीहून अधिक वाढली.
‘भैरवी’ या एकाच रागात सप्तस्वरांमधील सगळे स्वर कोमल आहेत. त्यामुळे हा राग अधिक निर्गुण आहे. ‘भैरवी’ या रागातील स्वर ऐकल्यावर व्यक्ती निर्गुणाकडे गेल्यावर तिला अन्य स्वर ऐकून पुन्हा सगुणात येण्याची इच्छाच उरत नाही. त्यामुळे ‘भैरवी’ या रागाने किंवा या रागातील गायन किंवा वादन यांनी कार्यक्रमाचा शेवट करतात.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२ इ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘तीव्र स्वर’ (टीप ३) गायल्यावर साधकांवर झालेले परिणाम
टीप ३ – जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक उंचीवर जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प उंचीवर असतो, त्याला ‘तीव्र स्वर’ असे म्हणतात.
१. श्री. चिटणीसकाकांनी तीव्र मध्यम असलेली स्वरसंगती (स्वरांचे संयोजन) बर्याच वेळ म्हटल्यावर ‘या स्वरांतून पुष्कळ मारक शक्ती प्रक्षेपित झाली’, असे मला आणि साधकांना जाणवले. (‘म’ हा एकच तीव्र स्वर आहे.)
२. काकांचे गायन संपल्यावर सगळे साधक अनुमाने अर्धा घंटा स्तब्ध होते. हे स्वरांचे एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले.
‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष
आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा अनुमाने तिपटीहून अधिक वाढली.
३. निष्कर्ष
राग किंवा अन्य उपशास्त्रीय प्रकार (चैती, होरी, कजरी, ठुमरी, टप्पा इत्यादी गायनप्रकार) यांत अल्प-अधिक शब्द असतातच. रागांमध्ये शब्द अल्प असूनही त्यांत रंजकता (मनोरंजन करण्याची क्षमता) असते. त्यामुळे ते ‘सगुण’ किंवा ‘सगुण-निर्गुण’ या स्तरांवर असतात. या ठिकाणी श्री. चिटणीसकाकांनी केवळ स्वरविस्तार म्हटला. ‘तो अधिक निर्गुण असल्याने त्यातून आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना आध्यात्मिक लाभ झाला’, असे मला जाणवले.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०२२)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |