साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विनंती
‘सनातनच्या संपर्कात असलेले एक ज्योतिषी सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणार्या साधकांविषयी पुढील प्रकारचे अपसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
१. टीका : १० वर्षे पूर्णवेळ साधना करणार्याच्या मुखमंडलावर (तोंडवळ्यावर) तेज दिसायला हवे. ते साधकांच्या मुखमंडलावर दिसत नाही.
स्पष्टीकरण :
१ अ. मुखमंडलावर तेज दिसणे, हा साधना करून आध्यात्मिक उन्नती झाल्याच्या संदर्भात दिसणार्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. वाणी चैतन्यमय होणे, मुखमंडल आनंदी होणे, सुगंध येणे, अंतर्मनात नामजप होणे इत्यादी अनेक लक्षणे असतात. त्यामुळे उन्नती झाल्यानंतर ‘मुखमंडलावर तेज दिसायलाच हवे’, असे नाही.
१ आ. बर्याचदा प्रारब्धाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींचा त्रास अधिक असल्यास त्यांची तीव्रता अल्प करण्यासाठी साधना खर्च होते. त्यामुळे प्रारब्धाची तीव्रता घटून साधना चांगली होऊ लागते.
१ इ. साधकाच्या मुखमंडलावरील तेज साधना न करणार्या सामान्य व्यक्तीला लक्षात येत नाही.
१ ई. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहायला येणारे संत, मान्यवर, जिज्ञासू अशा अनेकांनी ‘आश्रमातील साधकांचे चेहरे प्रसन्न असतात, त्यांच्या चेहर्यावर तेज असते, त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते’, अशा शब्दांत कौतुक केले आहे. हे कौतुक म्हणजे सनातनचे साधक निरपेक्षपणे आणि तळमळीने करत असलेली साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यांना मिळालेली पोचपावतीच आहे.
(यावरून हे ज्योतिषी सनातनच्या साधकांविषयी कसा अपप्रचार करत आहेत, हे लक्षात येईल ! – संकलक)
२. टीका : पूर्णवेळ साधना करणार्याच्या मनाला मायेचा विचार स्पर्शही करत नाही.
स्पष्टीकरण : ७० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाच्या मनाला कमी – अधिक प्रमाणात मायेचा विचार स्पर्श करण्याची शक्यता असते !
३. टीका : भावनेच्या भरात काही साधकांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेतला की, धड साधनाही होत नाही आणि धड व्यवहारही होत नाही. नंतर या गोष्टींमुळे निराशा येते.
स्पष्टीकरण : मुळात मानवी जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीने पूर्णवेळ साधना करणे, हा सर्वाेत्तम निर्णय असतो. प्रारब्धामुळे किंवा अडचणींमुळे पूर्णवेळ साधनेपासून दूर झालेल्यांचीही भगवंत आध्यात्मिक काळजी घेतो. तसेच पूर्णवेळ साधना केल्याने निराशा आल्याचे सनातन संस्थेमध्ये एकही उदाहरण नाही !
अशा प्रकारे सनातनची साधना आणि साधक यांच्या संदर्भात अपसमज पसरवणार्या ज्योतिष्यांपासून साधकांनी सावध रहावे !’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था (८.१२.२०२१)