सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राविषयी सौ. मीना धुमाळ यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीना धुमाळ यांना आलेल्या अनुभूती

१. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पहातांना ‘प.पू. भक्तराज महाराज काहीतरी सांगत आहेत’, असे साधिकेला जाणवून तिला होणार्‍या त्रासानुसार त्यांच्या तोंडवळ्यात पालट होत असल्याचे जाणवणे

सौ. मीनाक्षी धुमाळ

‘मागील दोन ते अडीच वर्षांपासून मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी जात आहे. नामजपाला बसल्यावर अनेकदा मी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या तोंडवळ्याकडे पहाते. त्या वेळी ‘ते मला काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवते. मला होणारा त्रास वाढला की, मला प.पू. बाबांचा तोंडवळा लालसर दिसतो. मी नामजप करत असतांना मला त्यांच्या तोंडवळ्यात पालट जाणवतो.

२. प.पू. बाबांचा ज्या बाजूचा तोंडवळा लालसर रंगाचा दिसत असे, साधिकेला तिच्या शरिराच्या त्याच बाजूच्या भागात त्रास जाणवणे

कधी कधी मला प.पू. बाबांच्या तोंडवळ्याचा काही भाग तेजस्वी दिसतो, तर कधी काही भाग काही क्षण काळसर लाल रंगाचा दिसतो. मला जेव्हा प.पू. बाबांचा तोंडवळा ज्या बाजूला लालसर झालेला दिसत असे, तेव्हा माझ्या शरिराच्या त्या बाजूलाच त्रास होत असे. अशी अनुभूती मला बर्‍याच वेळा येते.

३. मागील चार मासांपासून प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र तेजस्वी आणि सजीव झाल्याचे जाणवणे

मागील ४ मासांपासून (म्हणजे ऑक्टोबरपासून) ध्यानमंदिरात प.पू. बाबांना प्रार्थना आणि नमस्कार केल्यानंतर मला त्यांचा तोंडवळा एकदम तेजस्वी दिसतो. तेव्हा मला चांगले वाटते. प्रत्यक्षात मला त्रासही होत असतो; परंतु त्यांचा तो चैतन्यमय तोंडवळा पाहून मला फार आनंद होतो. छायाचित्रातील प.पू. बाबांच्या तोंडवळ्याकडे पहातांना मला त्यांचे छायाचित्र सजीव झाल्यासारखे वाटते. ‘प.पू. बाबा डोळ्यांच्या माध्यमातून माझ्याशी काहीतरी बोलत आहेत’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती होते.’

– सौ. मीनाक्षी धुमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.