आधुनिक सुशिक्षित तरुणांच्या धार्मिक मनोभूमिकेसंबंधी काही विचार !

१. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे ?

उत्तम नागरिक निर्माण करणे, हे शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. उत्तम नागरिकाचे कर्तव्य दोन प्रकारचे असते. स्वतःचा भार इतरांवर न टाकणे आणि समाजाच्या प्रगतीस साहाय्य करणे, ही उत्तम नागरिकाच्या कर्तव्याची दोन अंगे होत. प्रथमतः व्यक्तीने स्वतःची बौद्धिक, कायिक (शारीरिक) आणि मानसिक उन्नती केल्याविना एखाद्या व्यक्तीला उत्तम नागरिक स्तराच्या पायरीवर पाय ठेवता येणे शक्य नाही.

२. आधुनिक सुशिक्षितांची बौद्धिक उन्नती !

आपल्या आधुनिक सुशिक्षितांच्या बौद्धिक उन्नतीविषयी शंका काढण्यास जागा राहिलेली नाही. बौद्धिक शिक्षणाच्या जोडीस काही व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या सुशिक्षित तरुणाने आजपर्यंत शारीरिक उन्नतीकडे दुर्लक्ष केले आहे आणि शरीरसंपदेविषयी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या गोष्टींकडेही आपले लक्ष वेधले जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. याखेरीज धार्मिक शिक्षणाचा प्रश्न आपण हाती घेणे आवश्यक आहे.

३. आधुनिक सुशिक्षितांची धर्माविषयी विचारांची स्थिती !

सध्याच्या पिढीत धर्माविषयी निदान धर्माविषयी रूढ असलेल्या कल्पनेविषयी तरी श्रद्धा फारशा प्रमाणात दिसून येत नाही. ‘सध्याचा तरुण नास्तिक आहे’, असे विधान सरसकट करणे धोक्याचे आहे. धर्माविषयी विचार करण्यास लागणारी सवड आणि मनाची चांगली शांतता विद्यार्थ्यांना लाभत नाही. ही गोष्ट खरी; पण एकंदरीत धर्माविषयी थोडाफार विचार करणारा विद्यार्थी विरळा ! आता आधुनिक सुशिक्षित तरुणांमध्ये आढळून येणारी धर्माविषयी किंवा ईश्वराविषयी अनास्था ही गोष्ट योग्य आहे किंवा कसे ? या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

४. मागील पिढ्या आणि सध्याची पिढी यांमधील धार्मिक विचारांच्या संदर्भात असलेला भेद !

मागच्या १-२ पिढ्या आणि सध्याची पिढी यामधील धार्मिक विचारांच्या संदर्भात असलेला भेद प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे सध्याची पिढी अधिक अश्रद्ध आहे. पण सूक्ष्म रितीने विचार केला असता असे दिसून येईल की, मागच्या पिढ्यांत दिसून येणारी सुलभ श्रद्धा आधुनिक तरुणांमध्ये नाही. आधुनिक तरुण दुसर्‍यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवून कोणतीच गोष्ट मान्य करण्यास सिद्ध नाही. सध्याच्या तरुणास घरी किंवा बाहेर आपल्या स्वातंत्र्याची पायमल्ली होणार नाही, याविषयी तो जागृत असतो. अर्थात्च आधुनिक तरुण धर्माविषयी किंवा ईश्वराविषयी प्रचलित कल्पनांवर विश्वास ठेवण्यास सिद्ध नसतो. सध्याच्या तरुणांच्या चैतन्यास धार्मिक आणि ईश्वरविषयक विचारांच्या संदर्भात कसे वळण लावता येईल ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

(साभार : मासिक ‘मनोरंजन’)