सौ. पार्वती जनार्दन यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, यासंदर्भात आलेली प्रचीती !

सौ. पार्वती जनार्दन

१. परात्पर गुरु डॉक्टरांना सदरा योग्य मापात होण्यासंदर्भात बोलत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे’, याची जाणीव होणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा सदरा शिवण्याची सेवा करतांना ‘सदरा घातल्यावर त्याला चुण्या न येण्यासाठी तो कसा शिवायचा ?’, हे परात्पर गुरु डॉक्टर मला शिकवत होते. त्यांनी सदरा घातल्यावर सदर्‍याच्या हाताच्या काखेतील भागात चुण्या येत होत्या. मी त्या शिलाईद्वारे घालवण्यासाठी प्रयत्न करत होते. सदर्‍याच्या एका हाताच्या चुण्या काढल्यावर त्याच्या दुसर्‍या हाताच्या ठिकाणी चुण्या येत होत्या. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मला दोनच हात आहेत. त्यामुळे मला चुण्यांचा अभ्यास करणे सुलभ आहे. अधिक हात असते, तर एक दुरुस्ती केली की दुसरी, दुसरी केली की तिसरी, असे पुष्कळ कठीण झाले असते.’’ तेव्हा ‘ते चतुर्भुज श्रीमहाविष्णूच्या संदर्भात बोलत आहेत’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. ‘मला त्याची जाणीव सतत रहावी’, यासाठी गुरुदेव असे म्हणाले’, असे मला वाटले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांचा सदरा शिवण्यापूर्वी प.पू भक्तराज महाराज यांना प्रार्थना करणे

२ अ. अनेक वेळा प्रयत्न करूनही सदर्‍यावर चुण्या येणे आणि सदरा शिवण्यापूर्वी प.पू. भक्तराज महाराज यांना ‘तुम्हीच माझ्याकडून तुमच्या शिष्योत्तमासाठी सदरा शिवण्याची सेवा करवून घ्या’, अशी प्रार्थना करणे : मी अनेक वेळा पुष्कळ प्रयत्न करूनही सदर्‍यावर चुण्या यायच्या. मी बर्‍याच कालावधीपासून गुरूंना अपेक्षित असा सदरा शिवण्याचा प्रयत्न केला, तरी ते शक्य होत नव्हते. त्यामुळे एकदा सदरा शिवतांना मी प.पू. भक्तराज महाराज यांना ‘प.पू. बाबा, तुम्ही महान गुरु आहात. ‘तुमचा शिष्योत्तम असलेल्या माझ्या महान गुरुदेवांसाठी कशा पद्धतीने कपडे शिवायला पाहिजेत’, ते तुम्हीच समजू शकता. तुमच्या शिष्यासाठी, म्हणजे माझ्या महान गुरुदेवांसाठी त्यांना अपेक्षित असा सदरा मला शिवता येऊ दे. तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करवून घ्या. मी तुम्हाला शरण आले आहे’, अशी प्रार्थना केली.

२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून सदरा शिवल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना सदरा आवडणे : एकदा मी परात्पर गुरुदेवांसाठी पिवळ्या रंगाच्या जुन्या कापडाचा एक सदरा शिवला. ‘सदर्‍यावर चुण्या येऊ नयेत’, यासाठी मी प्रयोग म्हणून जुन्या कापडाचा सदरा शिवला होता. गुरुदेवांनी हा सदरा घालून पाहिला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला आज पुष्कळ आनंद होत आहे. मला अतिशय चांगला सदरा शिवून दिला आहेस.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘या वेळी मला देवाविना कुणाचा आधार नसल्याने मी प.पू. भक्तराज महाराज यांना शरण जाऊन ‘तुम्हीच माझ्याकडून सदरा शिवण्याची सेवा करवून घ्या’, अशी प्रार्थना केली होती.’’

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी आपत्काळात वापरण्यासाठी फाटलेल्या कपड्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याचे तंत्र शिकायला सांगणे

गुरुदेवांची प्रतिदिन घालण्याची फाटलेली बंडी दुरुस्त करण्याची सेवा मला करायची होती. ती मी दुरुस्त करून दिल्यावर परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘छान आहे. आपत्काळात कपडे मिळाले नाहीत, तर फाटलेलेच कपडे दुरुस्त करून वापरायला लागतील. ‘फाटलेल्या कपड्यांची दुरुस्ती चांगलीे कशी करता येईल ?’, हे शिकून घ्या.’’

४. एक बंडी ८ वेळा दुरुस्त केल्यावर ‘८ हा अंक श्रीकृष्णाशी संबंधित असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांना ती बंडी व्यवस्थित बसणार’, असे वाटणे आणि तसेच घडणे

मी दुरुस्त केलेल्या २ बंड्या गुरुदेवांना दाखवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्यांनी बंडी घातल्यावर त्या त्यांना व्यवस्थित झाल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण याची किती वेळा दुरुस्ती केली ?’’ मी म्हणाले, ‘‘पहिली बंडी १३ वेळा आणि दुसरी बंडी ८ वेळा.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘बंडीच्या नशिबात एवढेच होते.’’ तेव्हा ‘आज बंडीच्या सेवेतील माझा शेवटचा दिवस आहे. माझ्या नशिबात आजपर्यंतच गुरूंची सेवा होती. त्यासाठी ते असे म्हणाले असतील’, असे मला वाटले.

‘८ हा अंक श्रीकृष्णाशी संबंधित आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना आज बंडी व्यवस्थित बसणार’, असे परात्पर गुरु डॉक्टरांना बंडी दाखवण्यापूर्वीच मी एका साधकाला म्हणाले होते आणि तसेच झाले.’

– सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.