महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य ! – पूर परिषद

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्रातील कोयना धरणातून बाहेर पडणारे पाणी आणि कर्नाटक येथील आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच महाराष्ट्र अन् कर्नाटक राज्यांत समन्वय ठेवल्यास पूर टाळणे शक्य आहे, असे मत नृसिंहवाडी येथील पूर परिषदेत व्यक्त करण्यात आले. या परिषदेत नदीची पाणीपातळी, पाऊस आणि सर्व धरणांमधील पाणीसाठा यांची एकत्रित माहिती मिळावी, सांगली जिल्ह्यातील टेंभू-ताकारी म्हैशाळ उपसा सिंचन योजनेतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवावे, कोयना धरणापासून आलमट्टी धरणापर्यंतच्या नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी यांसह विविध ठराव या प्रसंगी करण्यात आले.

या परिषदेत पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम्.के. कुलकर्णी म्हणाले, ‘‘जल आयोगाने पाण्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करून कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास महापूर टळू शकतो.’’ या परिषदेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची मते व्यक्त केली.