कोल्हापूर येथे रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची घरे यांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी !

रुग्णालयांतील अनागोंदी कारभाराविषयी तक्रारींमुळे धाडी घातल्याची चर्चा

लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक यांच्या समवेत आता रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांच्यावर धाडी टाकाव्या लागणे, हे वैद्यकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार वाढल्याचे लक्षण !

कोल्हापूर – शहरातील चार नामवंत रुग्णालये  आणि काही आधुनिक वैद्यांची घरे यांवर ६ डिसेंबर या दिवशी प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्या. या कारवाईत पुणे आणि संभाजीनगर येथील अधिकारी अन् कर्मचारी यांचा समावेश होता. या धाडीत रुग्णालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेण्यात आली आहेत. बहुतांश रुग्णालयांमध्ये अनागोंदी कारभार असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाइकांकडून होतात. रुग्णांच्या नातेवाइक यांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात, असे आरोप काही दिवसांपूर्वीच लोकप्रतिनिधींनी केले होते; मात्र या कारवाईविषयी कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ, बसंत बहारजवळील नुकतेच प्रसिद्धीस आलेले एक रुग्णालय, क्रशर चौकातील तसेच राजारामपुरीतील प्रसिद्ध रुग्णालय यांचा यात समावेश आहे. पथकांनी रुग्णालयामध्ये प्रवेश करताच उपस्थित कर्मचारी आणि आधुनिक वैद्यांचे भ्रमणभाष, भ्रमण संगणक कह्यात घेतले. याच वेळी चारही आधुनिक वैद्यांच्या निवासस्थानीही पथकांनी धाडी टाकल्या.


Multi Language |Offline reading | PDF