रामनाथी आश्रमात झालेल्या पहिल्या युवा साधक प्रशिक्षण शिबिराच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

१८ ते २१.१०.२०१७ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात पहिल्या युवा साधक प्रशिक्षर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. जयेश ताटीपामूल

१. महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भोजनकक्षात गेल्यावर सुगंध येणे आणि तेथे अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवणे

प्रसाद घेण्यासाठी भोजनकक्षात गेल्यावर तेथे मला वेगळाच सुगंध येत होता. भोजनकक्षात आणि स्वयंपाकघरात अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व आहे, असे मला जाणवले. कितीही पैसे व्यय केले, तरी असा प्रसाद मिळणे शक्य नाही. आमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत !

२. उपायांच्या खोलीत नामजप करतांना समोर सद्गुरु सत्यवानदादा नामजप करण्यासाठी येऊन बसणे, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आहे, असे जाणवणे आणि प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवण्याची इच्छा सद्गुरु सत्यवानदादांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने भावजागृती होणे

१८.१०.२०१७ या दिवशी सकाळी १० वाजता मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करण्यासाठी गेलो होतो. तेथे मी पुढे बसलो होतो. थोड्या वेळाने तेथे सद्गुरु सत्यवानदादा आले. ते माझ्या समोरच्या आसंदीवर बसले. त्यांनी त्यांचे पाय स्टुलावर ठेवले होते. तेव्हा मला वाटले, मी सद्गुरु दादांच्या चरणांवर मस्तक ठेवले आहे. त्या वेळी सद्गुरु दादांनी माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले. तेव्हा माझ्या सहस्रारातून एक वेगळेच चैतन्य शरिरात जाऊन माझे पूर्ण शरीर शहारले, असे मला जाणवले. त्या वेळी माझी भावजागृती झाली. परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती; कारण देव माझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहे, असे मला वाटले. एकदा तरी प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवूया, अशी इच्छा माझ्या मनात होती. प.पू. गुरुदेवांनी ती इच्छा सद्गुरु सत्यवानदादांच्या माध्यमातून पूर्ण केली.

३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

३ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रार्थना सांगत असतांना पुष्कळ भावजागृती होऊन प.पू. गुरुदेवांचे विराट रूप डोळ्यांसमोर उभे रहाणे आणि त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग चालू झाल्यावर माझे मन आनंदी होते; परंतु अकस्मात् माझ्या मनातले विचार वाढू लागले. मला झोप येत आहे, असे मला वाटत होते. नंतर सद्गुरु बिंदाताई म्हणाल्या, आपण प्रार्थना करून उपाय करूया. सद्गुरु ताई प्रार्थना सांगतांना मला वाटले, या क्षुद्र जिवाच्या मनातले ओळखून त्या माझ्यासाठी प्रार्थना घेत आहेत आणि ती थेट आतपर्यंत जात आहे. तेव्हा मी त्यांच्या चरणी मानस नमस्कार केला. सद्गुरु ताई कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणाल्या, श्रीकृष्णाला आर्ततेने आतून हाक मारूया. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होऊन प.पू. गुरुदेवांचे विराट रूप माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि त्यांच्या प्रती किती कृतज्ञता व्यक्त करावी, असे मला वाटले.

३ आ. सद्गुरु बिंदाताई साक्षात् लक्ष्मीदेवी वाटणे आणि त्यांना पाहून भावजागृती होणे : १९.१०.२०१७ या दिवशी सद्गुरु बिंदाताई सभागृहात आल्या. तेव्हा त्या मला साक्षात् लक्ष्मीदेवीच वाटत होत्या. त्यांना पाहून माझे मन आनंदाने उड्या मारत आहे, असे मला वाटले. त्यांना पाहून माझी भावजागृती होत होती. सद्गुरु ताईंनी सांगितलेला प्रत्येक शब्द आणि दृष्टीकोन अंतर्मनापर्यंत जात आहे, असे मला वाटत होते. सद्गुरु ताईंची दृष्टी प्रेमळ आणि वात्सल्यभावाने भरलेली होती. तिचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे.

३ इ. सद्गुरु बिंदाताई प्रार्थना सांगत असतांना आतून श्री लक्ष्मीरूपी सद्गुरु बिंदामातेच्या चरणी तुम्हीच मला गुरुचरणी न्या, अशी प्रार्थना होणे आणि सद्गुरु आई हात धरून गुरुचरणी नेत आहे, असे दिसणे : सत्रात सद्गुरु ताई म्हणाल्या, आता आपण लक्ष्मीदेवीला प्रार्थना करूया. ती मागेल ते देणार आहे. (तेव्हा मनात विचार आला, लक्ष्मीदेवीच सांगत आहे, मला प्रार्थना केल्यावर जे मागाल, ते मी देईन.) सद्गुरु ताई प्रार्थना करतांना म्हणाल्या, लक्ष्मीमातेला आजपर्यंत कधीच बोलावले नाही. आतून आर्ततेने प्रार्थना करा. तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि आतून श्री लक्ष्मीरूपी सद्गुरु बिंदामातेच्या चरणी प्रार्थना झाली, सद्गुरु आई, तुम्हीच मला गुरुचरणी न्या. मला लवकरात लवकर गुरुचरणी जायचे आहे. मला केवळ गुरुचरण पाहिजे आहेत. मला कशातही आणि कुणात अडकायचे नाही. त्या वेळी माझा भाव दाटून आला आणि सद्गुरु आई माझा हात धरून मला गुरुचरणीच नेत आहे, असे दिसले. त्या वेळी माझी प्रार्थना गुरुचरणी पोहोचली आहे, असे जाणवले. साक्षात् लक्ष्मीदेवीचे दर्शन देणार्‍या गुरुमाऊलीच्या आणि गुरुचरणी हात धरून नेणार्‍या लक्ष्मीरूपी सद्गुरु बिंदामातेच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत !

– गुरुसेवक,

श्री. जयेश ताटीपामूल (वय १८ वर्षे), सोलापूर (२०.१०.२०१७)

पू. संदीप आळशी यांच्यामधील सहजता आणि अहंशून्यता !

१९.१०.२०१७ या रात्री मला पू. संदीप आळशी यांचे दर्शन झाले. पू. दादा कुणा नातेवाईकांना सोडण्यासाठी बाहेर आले होते. त्या वेळी सौ. अवनीताईंनी (पू. संदीपदादांच्या पत्नीने) मला बोलावले आणि पू. दादांना सांगितले, हा तुमच्यासारखाच दिसतो. पू. दादा म्हणाले, अरे, हा तर माझ्याहून बरा दिसतो. त्यावर मी म्हणालो, पू. दादा, माझ्यात तुमच्यासारखे गुण जराही नाहीत.पू. दादा पटकन म्हणाले, माझ्यात कुठले गुण आहेत ? मी तर तुमच्यासारखाच आहे. तेव्हा पू. दादांमध्ये अहंचा लवलेश नाही, हे माझ्या लक्षात आले आणि त्यांच्यातील सहजता माझ्या लक्षात आली. आम्ही एकमेकांना नमस्कार करत होतो. त्या वेळी पू. दादांच्या चरणी प्रार्थना झाली, आपल्यातले गुण माझ्यातही येऊ देत.

– गुरुसेवक,

श्री. जयेश ताटीपामूल (वय १८ वर्षे), सोलापूर (१९.१०.२०१७)                 –

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now