शेतकर्‍यांसमोरील संकट !

सध्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. येथील शेतकर्‍यांच्या कापसाचे पिकांवर यंदा बोंडआळीचा प्रादुर्भाव होऊन ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात बीटी कापसाची बियाणे पेरली. आरंभी रोपांची उत्तम वाढही झाली. त्याला हिरवेगार बोंडही आले; मात्र कालांतराने त्याच्या आतील कापूस गुलाबी बोंडआळीने पार पोखरून टाकल्याचे निदर्शनास आले. हे चित्र एक दोन गावांपुरते किंवा शहरापुरतेच मर्यादित नसून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व भागांत हे पहावयास मिळत आहे. परिणामी उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकर्‍यांवर ओढवली आहे. गेल्या वर्षी ज्या भागात हेक्टरी २५ क्विंटल कापसाचे पीक घेतले जात होते, तेथे आज ते हेक्टरी १ क्विंटल तरी घेतले जाईल का, याविषयी कापूस उत्पादक शेतकरी साशंक आहेत. ज्या शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह कापसाच्या रोख पैशांवरच अवलंबून असतो, त्यांच्यासमोर यक्षप्रश्‍न उभा राहिला आहे. या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दोषी आस्थापनांवर कारवाई करा !

वास्तविक बी विक्रेत्या आस्थापनांकडून बी टी जातीच्या बियाणांवर कधीही बोंडआळीचा प्रादुर्भाव होत नाही, असे अगदी ठासून सांगितले जाते. त्यासाठी ते बियांसाठी मोठे मूल्यही आकारतात. तरीही यंदा प्रादुर्भाव झाला. म्हणजेच ही बियाणे निकृष्ट दर्जाची होती, हे स्पष्ट होते. हा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी याविषयी बी विक्रेत्या आस्थापनांना सांगितल्यावर त्यांनी फवारणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शेतकर्‍यांनी तीही केली; मात्र तरीही हा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही. अशा आस्थापनांवर कारवाई झाली पाहिजे. पिकांच्या लागवडीसाठी लागणारा व्ययही वसूल होऊ शकत नसल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. एकूणच बोंडआळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनाची जी हानी झाली आहे, ती सहस्रो-कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. ती सरकारला शेतकर्‍यांना द्यावी लागणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारची कसोटी लागणार आहे, हे निश्‍चित !