(बर)बादशाही परंपरा !

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. ती ११ डिसेंबरला होईलच. त्यांची ही निवड बादशाही परंपरेला अनुसरून असल्याचे त्यांच्याच पक्षाचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सांगितले आणि सर्वच काँग्रेसवाल्यांना अडचणीत आणले. मणिशंकर अय्यर यांनी या वेळी औरंगजेबाच्या वंशावळीचे उदाहरण सांगून भाजपच्या हातात आयतेच कोलीत दिले. हे सर्व म्हणजे फूटबॉल या खेळात एका बाजूच्या संघातील खेळाडूने स्वतःच्या जाळीतच गोल मारण्यासारखे आहे. त्यामुळे विरोधी संघाला जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करायलाच नकोत. अशीच स्थिती राजकारणात सध्या भाजपची आहे. काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी लादेनजी म्हणणे, मणिशंकर अय्यर यांनी पाकमध्ये जाऊन मुशर्रफ यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, तेथील नेत्यांना भारतात आम्हाला सत्तेवर आणा, अशी विनवणी करणे, आदी गोष्टी वर्ष २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची हाराकिरी करणार्‍या ठरल्या होत्या. त्यातून काहीच धडा न घेता काँग्रेसचे नेते बेताल विधाने करून पक्षालाच अडचणीत आणत आहेत. काँग्रेसची ही गत पाहून जनता तरी काँग्रेसला सत्तेवर कशी काय बसवेल ? जे नेते आपल्याच पक्षाला बुडण्यापासून वाचवू शकत नाहीत, त्यांना सत्तेवर बसवण्यात अर्थ नाही, एवढे कळण्याएवढी भारतीय जनता नक्कीच सूज्ञ आहे.

राहुल गांधी यांच्या निवडीची प्रक्रिया पाहिल्यास काँग्रेसमध्ये लोकशाहीला कसे स्थान नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या निवडणुकीसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज आला होता आणि तो राहुल गांधी यांचा होता. त्यामुळे बाकीची निवडणूक प्रक्रिया हा केवळ फार्स होता आणि ती निवडणूक नसून केवळ निवड होती. काँग्रेसवाल्यांच्यात एक अंधश्रद्धा आहे, ती म्हणजे गांधी घराणेच काँग्रेसला चांगले दिवस आणू शकते. त्यामुळे नरसिंहराव पंतप्रधान असतांना सीताराम केसरी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही काही अंधश्रद्धाळू काँग्रेसजनांनी सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्याची गळ घातली होती. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. या प्रत्येक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधी यांना चमकवण्याचा (त्यांची प्रतिमा उंचावण्याचा) प्रयत्न केला; पण प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि राहुल गांधी अपयशी म्हणूनच अधिक चमकले. राहुल गांधी यांनीही त्यांच्या ट्विटरवर चुकीची आकडेवारी, विधाने करून स्वतःला हास्यास्पद बनवले आहे. कालही त्यांनी महागाईच्या सूत्रावरून केलेल्या ट्वीटमधील आकडेवारी चुकली होती. यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रतिसाद देतांना ते म्हणतात, मी माणूस आहे. मी नरेंद्र भाईंसारखा नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका होतात. त्यामुळेच आयुष्यात रंगत येते. चुका करून राहुल गांधी यांच्या आयुष्यात कोणती रंगत येते ? राहुल गांधी यांच्या घराण्यात चुकांची परंपराच आहे आणि या सर्व चुकांचे फळ भारतीय जनता भोगत आहे. भारतीय जनतेचे हे भोग त्यांच्या जीवनात रंगत आणते का ? राहुल गांधी मोदी यांच्यावर टीका करतांना ते स्वतः भारतातील गरीब जनतेचे कैवारी असल्याचे भासवतात; पण स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देशातील गरिबी दूर करू न शकल्याची त्यांना लाज वाटत नाहीच वरून ते त्या सूत्राचा वापर मते मागण्यासाठी करतात हे आणखी लज्जास्पद ! त्यामुळे देशाला अधोगतीकडे नेणार्‍या या (बर)बादशाही परंपरेला जनतेनेच योग्य जागा दाखवावी !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now