स्वतःच्या प्रकृतीनुसार नामजपादी उपाय करतांना तारक किंवा मारक भाव ठेवून उपायांची पूर्ण फलनिष्पत्ती मिळवा !

(पू.) श्री. संदीप आळशी

सध्या वाईट शक्तींचे त्रास वाढले असून त्यांच्याशी लढण्यासाठी आध्यात्मिक उपाय, हेच एकमात्र शस्त्र आपल्याकडे आहे. नामजपादी आध्यात्मिक उपाय भावपूर्ण केले, तरच आपल्याला उपायांची पूर्ण फलनिष्पत्ती मिळते. बहुतेक साधक एक कर्मकांड म्हणून उपाय पूर्ण करतात किंवा त्यांचे उपायांमध्ये मन नसते. काही साधकांवर त्रासामुळे आवरण आल्याने त्यांच्याकडून उपाय नीट होत नाहीत. उपाय परिणामकारक होण्यासाठी उपायांच्या वेळी भाव ठेवणे नितांत आवश्यक आहे.

१. तारक प्रकृती असलेल्यांनी ठेवायचा तारक भाव

तारक प्रकृती असलेल्यांचा तारक भाव लवकर जागृत होतो. यासाठी अशांनी उपाय करतांना तारक भाव ठेवणे अधिक लाभदायी आहे. तारक भावाची काही उदाहरणे याप्रमाणे आहेत – नामजप किंवा मंत्रजप करतांना नामजपरूपी किंवा मंत्रजपरूपी एकेक फूल मी देवतेच्या चरणी अर्पण करत आहे, नामजप किंवा मंत्रजप करतांना माझ्या देहात नामरूपी किंवा मंत्ररूपी चैतन्य भरले जात आहे आणि नामजप किंवा मंत्रजप करतांना माझ्यामध्ये देवतेचा वास आहे आणि देवताच माझ्या देहातून नामजप किंवा मंत्रजप करत आहे.

२. मारक प्रकृती असलेल्यांनी ठेवायचा मारक भाव

मारक प्रकृती असलेल्यांचा मारक भाव लवकर जागृत होतो. यासाठी अशांनी उपाय करतांना मारक भाव ठेवणे अधिक लाभदायी आहे. मारक भावाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. घोडखिंड लढवतांना बाजीप्रभु देशपांडे यांच्या शरिरावर एकही अशी जागा शिल्लक नव्हती की जेथून रक्त भळाभळा वहात नव्हते, तरी छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत त्यांनी खिंड लढवतांना मृत्यूलाही रोखून धरले होते. सिंहगड घेतांना तानाजी मालुसरे यांचा एक हात तुटला, तरी त्यांनी शत्रूच्या किल्लेदाराला संपवूनच शेवटचा श्‍वास घेतला होता. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी या विरांनी पराक्रमाची शर्थ केली. आपल्यालाही क्षात्रवृत्तीने नामजप किंवा मंत्रजप करून आपल्याला त्रास देणार्‍या वाईट शक्तींना पूर्णपणे पराजित करून आनंदी व्हायचेच आहे.

आ. नामजपरूपी किंवा मंत्रजपरूपी शस्त्राने माझ्या शरिरातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे.

इ. भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र माझ्या भोवती फिरत असून त्याने माझ्या शरिराभोवतीचे सर्व त्रासदायक आवरण नष्ट होत आहे.

ज्यांना स्वतःची प्रकृती ओळखता येत नसेल, त्यांनी तारक आणि मारक अशा दोन्ही पद्धतींनी उपाय करून ज्या पद्धतीने उपाय अधिक चांगले होतात, त्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करावा.

– (पू.) श्री. संदीप आळशी (२.१२.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now