पालथ्या घड्यावर पाणी !

अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली. अमेरिकेचे अधिकारी, मंत्री तसे वारंवार पाकला भेट देतच असतात. या भेटीची फलनिष्पत्ती काय असते, हा वेगळा विषय. भेटीच्या वेळी नेहमीप्रमाणे आतंकवादावर चर्चा होते आणि दौरा समाप्त होतो. मॅटिस यांच्या भेटीच्या वेळीही तेच झाले. त्यांनी पाकचे पंतप्रधान, तसेच तेथील सैन्यप्रमुख यांची भेट घेतली. आतंकवादाचा निःपात करण्यासाठी पाकने दुपटीने प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला त्यांनी दिला. पाकला असा सल्ला या आधी कित्येक वेळा दिला गेला आहे. असे सल्ले, सुचना, चेतावणी यांना पाक भीक घालत नाही. या वेळीही त्याने साळसूदपणे आमचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानमधील अस्थिरता हटून तेथे स्थिरता आल्यास त्याचा पाकला लाभ होईल. आतंकवादाचा सर्वांत मोठा फटका पाकला बसला आहे, असा सूर आळवला. पाककडून वेगळी अपेक्षा करणे हास्यास्पद ठरेल. येथे अमेरिकेच्या भूमिकेविषयी हसू येते. पाक आतंकवादाला खतपाणी घालत आहे. एवढेच नव्हे, तर कुख्यात आतंकवादी हाफीज सईद हा पाकमध्ये होणारी निवडणूक लढवणार आहे. एका देशात आतंकवादी पक्ष काढून निवडणूक लढवतो, यावरून त्या देशाची दुःस्थिती आपल्या लक्षात येईल. हे अमेरिकेला किंवा विश्‍वशांतीचा ठेका घेतलेल्या संयुक्त राष्ट्रांना ठाऊक नाही, असे नाही. आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांनी इराण, उत्तर कोरिया, सुदान, सिरीया या देशांना आतंकवादी राष्ट्रे घोषित करून त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. ज्या राष्ट्रांमधील आतंकवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांततेस धोका उद्भवतो, त्यांना आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यात येते. या सर्व निकषांमध्ये पाक यथायोग्य बसतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, हे चिड आणणारे आहे. संयुक्त राष्ट्रांचा कारभारावर अमेरिकेचा प्रभाव आहे, हे सर्वश्रुत आहे. ९/११ च्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी ओसामा बिन लादेन याला ठार मारण्यासाठी अमेरिकी सैनिक पाकमध्ये घुसले होते. पाकमधील आतंकवादाची झळ जगाला बसत असतांना त्याच्यावर कारवाई करण्यापासून अमेरिकेला कोणी रोखले आहे ? पाक आतंकवादाच्या विरोधात काही करत नाही, हे ज्ञात असूनही अमेरिका त्याला आतंकवादाचा निःपात करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरवते. या निधीचा वापर पाक भारतविरोधी कारवाया करण्यासाठी करतो. तरीही अमेरिका या सर्व सूत्रांकडे डोळेझाक करते. याला एकच कारण भारत ! अमेरिकेला भारताने स्वतःपेक्षा वरचढ होऊ नये, अशी सुप्त इच्छा आहे. त्यामुळे पाकपुरस्कृत आतंकवादी भारतात थैमान घालत असतांना अमेरिका असल्या सूचना आणि चेतावण्या देण्याची भाषा करून गप्प बसते. वाईट गोष्ट म्हणजे भारतही अमेरिकेच्या या भूलथापांना बळी पडतो. भारत सरकारने पाकला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेवर विसंबून राहू नये. पाकला जी भाषा कळते, त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सरकारने आता सिद्ध व्हावे !