विविध कार्यक्रमांत सूत्रसंचालन, प्रवचन अथवा भाषण प्रभावीपणे करता यावे, यासाठी पुढील बारकावे लक्षात घ्या !

सूत्रसंचालक आणि वक्ता साधकांसाठी महत्त्वाच्या सूचना

‘हिंदु धर्मजागृती सभा, हिंदूसंघटन मेळावे, हिंदू अधिवेशन, गुरुपौर्णिमा महोत्सव आदी कार्यक्रमांत सूत्रसंचालन, प्रवचन अथवा भाषण करतांना सेवेची परिणामकारकता वाढण्याच्या दृष्टीने पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

१. पूर्वसिद्धता

१ अ. संहितेच्या (स्क्रिप्टच्या) संदर्भात

१. संहितेची प्रत काढतांना अक्षरांचा (फॉन्टचा) आकार आपल्या आवश्यकतेनुसार आहे, असे पहावे.

२. संहितेच्या एका पानावरील विषय संपल्यावर ते पान बाजूला करून ठेवता यावे, यासाठी विषय मांडायच्या वेळी सर्व पाने स्टेपलरच्या पीनमधून सुटी करून ठेवावीत. संहितेची पाने एकत्रित स्टेपल केेल्यास बोलतांना पाने उलटावी लागतात.

१ आ. वेशभूषा आणि अन्य

१. वक्त्याची वेशभूषा आणि केशभूषा नीटनेटकी असावी.

२. भडक रंगाचे कपडे परिधान न करता सात्त्विक रंगाचा (इस्त्री केलेला) भारतीय पोशाख घालावा.

३. ॐ किंवा  अशी धार्मिक चिन्हे असलेले कपडे वापरू नयेत. कपड्यावर नक्षी असल्यास ‘ती सात्त्विक आहे ना ?’, हे पहावे.

४. कॉलर असलेेला सदरा असात्त्विक असल्याने शक्यतो कॉलर नसलेला सदरा घालावा, तसेच सदर्‍याचे सर्वांत वरचे बटण लावलेले असावे.

५. स्त्रियांनी कुंकू लावावे, तर पुरुषांनी नाम ओढावा (तिलक लावावा).

१ इ. साधनेच्या संदर्भात

१. विषय मांडण्याचा ताण येत असल्यास ‘अ ३’ पद्धतीने स्वयंसूचना घेऊन प्रसंगाचा सराव करावा. ‘आपण केवळ माध्यम असून भगवंतच आपल्या वाणीतून बोलणार आहे’, अशी श्रद्धा ठेवावी.

२. श्री गुरूंना अपेक्षित असा विषय होण्यासाठी आधीपासूनच प्रार्थना, नामजप, आध्यात्मिक उपाय आणि संहितेचा परिपूर्ण सराव, यांकडे अधिकाधिक लक्ष द्यावे.

३. व्यष्टी साधना वाढवल्यास साधकाच्या वाणीत चैतन्य निर्माण होते. त्या चैतन्यामुळे विषय श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतो. व्यष्टी साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन तसे प्रयत्नही मनापासून करावेत.

२. प्रत्यक्ष विषय मांडतांना

२ अ. विषय मांडण्यातील बारकावे

१. संहितेतील सूत्रे पाठ करून पुस्तकी स्वरूपात न मांडता विषय अवगत करून स्वतःच्या शैलीत आणि बोली भाषेत मांडावा. त्यामुळे तो उत्स्फूर्त होईल अन् श्रोत्यांनाही जवळीक वाटेल.

२. शक्यतो श्रोत्यांकडे पाहूनच बोलावे. एखादे सूत्र विसरायला झाल्यास कागदावर लिहिलेले मनातल्या मनात वाचावे आणि नंतर पुन्हा श्रोत्यांकडे पाहून बोलावे. यामध्ये थोडा वेळ जातो; परंतु कागदाकडे पाहून बोललेले चांगले दिसत नाही.

३. सलग लांबलचक वाक्यांची गुंफण न करता लहान लहान वाक्यांनंतर पूर्णविराम घ्यावा. वक्त्यांनी सर्व शब्द आणि वाक्ये यांचा स्पष्ट उच्चार करावा. काही वेळा बोलण्याच्या ओघात शेवटच्या शब्दाचा उच्चार नीट न झाल्यास श्रोत्यांना वाक्याचा अर्थ समजत नाही.

४. श्रोत्यांना विषयाचे आकलन होण्यासाठी बोलण्याची गती एकसमान ठेवावी.

५. भाषेची अडचण असल्यास एखादा चुकीचा शब्द उच्चारण्याऐवजी पर्यायी हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरावा. असे केल्याने श्रोत्यांना विषय कळणे सुलभ होते.

६. श्रोत्यांनी मध्ये घोषणा दिल्यास किंवा टाळ्या वाजवल्यास थोडा वेळ थांबावे. घोषणा किंवा टाळ्या थांबल्यानंतर पुन्हा बोलणे चालू करावे.

७. मार्गदर्शन करतांना शारीरिक त्रास (उदा. खाज येणे, खोकला येणे) उद्भवल्यास बोलणे थांबवून तात्कालिक उपाय करावेत आणि मग पुन्हा बोलणे चालू करावे. खोकत बोलत असतांना आवाज नीट ऐकू येत नाही.

८. आजूबाजूला पहात बोलल्याने ध्वनीवर्धकामधून (माईकमधून) श्रोत्यांना आवाज नीट ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पाहूनच बोलावे. ‘आपला आवाज ध्वनीवर्धकावरून नीट ऐकू जात आहे ना, याकडे लक्ष द्यावे. बोलतांना ध्वनीवर्धकाला हात लागू नये’, याची काळजी घ्यावी.

काही वेळा विषय चालू असतांना ध्वनीवर्धक मध्येच ‘अ‍ॅडजस्ट’ करावा लागतो. तेव्हा वक्ता बोलत राहिल्याने आवाज सर्वांपर्यंत पोहोचत नाही. ध्वनीवर्धकाची ‘अ‍ॅडजस्टमेन्ट’ करून झाल्यावर पुन्हा बोलणे चालू करावे.

९. व्यासपिठावरील आसंदीवरून उठतांना सदरा अथवा साडी चुरगळलेली असल्यास ती नीट करावी.

२ आ. हावभाव

१. मानेची पुष्कळ हालचाल किंवा अनावश्यक हातवारे करू नयेत. आरशासमोर किंवा साधकांसमोर उभे राहून आपले हावभाव आणि हातवारे योग्य प्रकारे होण्यासाठी सराव करू शकतो. मान पुष्कळ वर करून म्हणजेच हनुवटी वर जाईल, अशा पद्धतीने बोलू नये.

२. विषयाच्या वेळी गंभीर सूत्र मांडतांना तोंडवळा गंभीर असावा, तर वैशिष्ट्यपूर्ण अथवा उत्साहवर्धक सूत्रे सांगतांना तोंडवळा आनंदी ठेवावा.

२ इ. अन्य महत्त्वाची सूत्रे

१. काही वेळा अधिक वेळ प्रस्तावना सांगून थोडक्यात विषय मांडल्याने श्रोते कंटाळतात. तसे न करता प्रस्तावना थोडक्यात सांगून मुख्य विषयाला अधिक वेळ द्यावा.

२. उपस्थितांपर्यंत जो विषय प्रामुख्याने पोहोचवायचा आहे, त्यापासून विषयांतर करू नये, नाहीतर विषय कंटाळवाणा होतो.

३. प्रवचन आणि भाषण नियोजित वेळेत चालू करून वेळेतच संपवावे. यामुळे अन्य वक्त्यांनाही बोलण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

४. अधिकाधिक सराव करून आत्मविश्‍वासाने, सहजतेने आणि अभ्यासपूर्ण विषय मांडावा.

एकंदरीत कार्यक्रमाची ७० टक्के फलनिष्पत्ती वक्त्यांच्या भाषणावर अवलंबून असते. त्यामुळे वक्त्यांनी भाषण आणि प्रवचन करतांना वरील बारकावे लक्षात घेऊन परिणामकारकरित्या विषय मांडावा.

उत्तरदायी साधकांसाठी सूचना

१. सूत्रसंचालन आणि वक्ते यांची निवड अभ्यासपूर्वक करावी.

२. सूत्रसंचालक आणि वक्ते यांना आयत्या वेळी अडचण आल्यास धावपळ होऊ नये, यासाठी सर्व जिल्हे अन् राज्ये यांमध्ये पर्यायी सूत्रसंचालक अन् वक्ते यांची सिद्धता ठेवावी.

३. कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना विषयाचा पूर्ण लाभ होऊन ते राष्ट्र आणि धर्म कार्यात कृतीशील व्हावेत, यासाठी वरील सूत्रांनुसार सूत्रसंचालक अन् वक्ते यांचा परिपूर्ण सराव झाल्याची स्थानिक उत्तरदायी साधकांनी निश्‍चिती करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now