अंनिसच्या लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र भगवंताने माझे रक्षण केले ! – भालचंद्र पाटील महाराज

मोराळे येथे सहस्रो भक्तांच्या उपस्थितीत दत्तजयंती उत्साहात साजरी !

दत्तजयंतीच्या सोहळ्यात मार्गदर्शन करतांना डावीकडे अधिवक्ता समीर पटवर्धन आणि शेजारी पाटील महाराज

मोराळे (जिल्हा सांगली), ३ डिसेंबर (वार्ता.) – मी नृसिंह सरस्वती महाराज यांची भक्ती करायला सांगतो, मी माझी भक्ती करायला सांगत नाही ! ज्यांना आध्यात्मिक त्रास होतो त्यांना केवळ ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगतो. अंनिसच्या लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र भगवंताने माझे रक्षण केले, असे मत थोर दत्तभक्त श्री. भालचंद्र भिकाजी पाटील महाराज यांनी व्यक्त केले. ते दत्तजयंतीच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलत होते.

या वेळी महाराज पुढे म्हणाले, ‘‘हे हिंदु धर्माचे स्थान आहे. इथे समाजाला साहाय्य दिले जाते. इथे कोणाचीही फसवणूक केली जात नाही. जे माझ्यावर आरोप करतात, त्यांनाही मी सांगतो की, येथे येऊन भक्ती करा.’’ या वेळी बारामती, इंदापूर, सांगलीवाडी येथील भक्तांनी अनुभवकथन केले. भक्तांनी दत्ताचा नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती सांगितल्या.

हिंदु धर्मावर आघात करण्याची आणि फूट पाडण्याची प्रथा निर्माण झाली आहे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

अंनिसच्या लोकांनी सामाजिक संकेतस्थळावर असणारी ध्वनीचित्रफीत पाहून महाराजांवर खोटा खटला प्रविष्ट केल्याने महाराजांना अटक झाली. हे आम्हाला अगोदर कळले असते, तर परिषदेने अटक होऊच दिली नसती. हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषद उभी रहाते आणि विनामूल्य सेवा देते. आजकाल हिंदु धर्मावर आघात करण्याची आणि फूट पाडण्याची प्रथा निर्माण झाली आहे, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी व्यक्त केले.

अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले की,

१. जादूटोणा कायद्याची दाहकता केवळ हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या कायद्याला तीव्र विरोध केला. यांच्या विरोधामुळेच कायदा संमत होतांना अनेक जाचक कलमे वगळावी लागली.

२. पुरोगामी लेखक आणि विचारवंत यांची हत्या झाल्यावर नेहमी हिंदुत्वनिष्ठांकडे बोट दाखवले जाते. वास्तविक याच्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. याचप्रकारे कॉ. पानसरे यांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आले.

३. हिंदु धर्म, संत, तसेच धर्मासाठी कार्य करणारे यांच्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून साहाय्य करण्यासाठी आम्ही २४ घंटे उपलब्ध आहोत. आम्ही पाटील महाराज यांच्या पाठीशी शक्तीनिशी उभे राहू !

४. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या  ‘परिवर्तन’ ट्रस्टला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. २०१० या आर्थिक वर्षांनंतर या ट्रस्टचा हिशेब धर्मादाय आयुक्तांना सादर केलेला नाही. हा विदेशी निधी हिंदुविरोधी कामासाठी वापरला जात असल्याची दाट शक्यता आहे. या कारणामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जो निधी शासन, तसेच अन्य देणगीद्वारे प्राप्त होतो, त्याचे नेमके काय होते, याचीही चौकशी करावी लागेल.

संत आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात भक्तांनी धर्मकर्तव्य म्हणून उभे राहिले पाहिजे ! – राजाराम रेपाळ, सनातन संस्था

महाराजांकडे आपण व्यक्तीगत अडचणी सोडवण्यासाठी येतो. महाराजांच्या माध्यमातून देव अडचणी सोडवतो. धर्मावर जेव्हा आघात होता. उदा. एखाद्या संतांना अटक होते, त्या वेळी मात्र आम्ही संत चुकीचे असल्याचे म्हणतो; मात्र असे नसते. हा भाग म्हणजे हिंदु धर्म, संत यांच्या विरोधात कट कारस्थान केलेले असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि धर्माचे कर्तव्य म्हणून अशा संतांना सर्वतोपरीने साहाय्य केले पाहिजे.

पाटील महाराज म्हणाले, ‘‘जरी हा कटू प्रसंग घडला, तरी सनातनसारखे चांगले लोक आम्हाला भेटले. सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवसेनेच्या लोकांनी आम्हाला साहाय्य केले.’’


Multi Language |Offline reading | PDF