चला आपण सगळे हिदु मूलतत्त्ववादी होऊया !

हिदूंना मूलतत्त्ववादी, आतंकवादी, हिंसाचारी म्हणणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना सणसणीत चपराक देणारा लेख

मारिया वर्थ यांचा परिचय

मारिया वर्थ या मूळच्या जर्मनी येथील असून त्यांनी हॅम्बर्ग विश्‍वविद्यालयातून मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे.पुढे ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या नियोजनाने त्यांनी जर्मनी सोडले.मार्गात असलेल्या भारतात काही दिवसांसाठी भेट देण्याच्या हेतूने त्या भारतात उतरल्या.वर्ष १९८० च्या हरिद्वार येथील अर्ध कुंभमेळ्यात सहभागी झाल्या.त्या वेळी त्यांना तेथे उच्चकोटीचे संत भेटले.त्यांच्या आशीर्वादाने मारिया भारतातच राहिल्या आणि ऑस्ट्रेलियात पुढे कधीच गेल्या नाहीत.त्यांना हे लक्षात आले की,हिंदु धर्मातील नीतीमूल्ये आणि शिकवण यांच्या विरोधात पद्धतशीररित्या षड्यंत्रे आखली जात आहेत.याचा विरोध करण्यासाठी आणि जगाला हिंदु धर्माचे महत्त्व कळावे म्हणून मारिया यांनी लिखाणास आरंभ केला.मारिया या त्यांच्या mariawirthblog.wordpress.com या ब्लॉगद्वारे हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार आणि धर्मावरील आघात यांविषयी लिखाण करत असतात.

प्रस्तुत लेखात मी ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांतील मूलतत्त्वे अन् हिंदु धार्मिक मूलतत्त्वे यांतील भेद दाखवला आहे.मला असे अनुभव आले आहेत की,जेव्हा जेव्हा विविध धार्मिक मूलतत्त्वांवर चर्चा घडून येते,तेव्हा तेव्हा हिंदू हा भेद लक्षात घेत नाहीत.त्यामुळे या लेखाचे शीर्षक प्रक्षोभक वाटत असले,तरी ते लेखाला सार्थकच आहे.

धार्मिक मूलतत्त्ववादी म्हणजे कोण ?

धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची संख्या वाढत आहे आणि हे आपल्या समाजाच्या दृष्टीने घातक आहे,याविषयी कुणाचे दुमत नाही;मात्र धार्मिक मूलतत्त्ववादी म्हणजे कोण ?याचा अभ्यास फारच थोडे लोक करतात.असे धार्मिक मूलतत्त्ववादी त्यांच्या धर्मातील मूलतत्त्वांवर ठाम असतात,यात शंका नाही.त्यांच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या पद्धतीने जीवन जगून ईश्‍वराला संतुष्ट करणे,अशा लोकांना आवडते.जर अशा धार्मिक मूलतत्त्ववाद्यांमुळे समाजात प्रश्‍न निर्माण होत असतील,तर त्याचा अर्थ धर्मांतील मूलतत्त्वेच समाजासाठी घातक आहेत,असे म्हणता येईल का ? या संदर्भात जगातील ३ प्रमुख धर्मांतील मूलतत्त्ववाद्यांचा अभ्यास करूया.

ख्रिस्ती मूलतत्त्ववादी : ख्रिस्ती धर्मातील मूलतत्त्ववादी असा विश्‍वास ठेवतात की,बायबलमध्ये ईश्‍वराने स्वत:ची ओळख करून दिली आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र (जीझस ख्राईस्ट)याला अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे.त्यांचा पहिल्या ईश्‍वरी आज्ञेवर (कमांडमेंटवर)विश्‍वास आहे.ती म्हणजे माझ्याव्यतिरिक्त अन्य कुणीही ईश्‍वर नाही. म्हणून अखिल मानवजातीने बायबलमधील ईश्‍वर आणि त्याचा एकुलता एक पुत्र जीझस ख्राईस्ट यांच्यावरच श्रद्धा ठेवावी.अन्यथा असे न करणारे लोक नरकात जातील. हा संदेश जगभर पसरवा,हा ख्रिस्ती धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे.म्हणूनच ख्रिस्ती धर्मातील मूलतत्त्ववादी जगात जेवढे काही अन्य धर्मीय असतील,त्यांना शक्य ते प्रयत्न करून ख्रिस्ती धर्मात आणणे,हे कर्तव्य समजतात.

मुसलमान मूलतत्त्ववादी : इस्लाम धर्मातील मूलतत्त्ववादी इस्लाम हाच एकमेव खरा धर्म असून अल्लाह हाच एकमेव ईश्‍वर आहे आणि त्यालाच सर्व जगाने शरण जावे,यावर विश्‍वास ठेवतात.जे इस्लाम धर्म स्वीकारणार नाहीत,ते सर्व नरकात जातील. इस्लाम धर्मातील हा मूलभूत सिद्धांत कुराण या धर्मग्रंथात वारंवार सांगितला गेला आहे.त्यामुळे इस्लाम धर्मातील मूलतत्त्ववादी सर्व मानवजातीने इस्लाम धर्म स्वीकारावा,यासाठी आग्रही असतात आणि त्यासाठी अन्य धर्मियांच्या मनात आत्यंतिक भीती निर्माण करणे,हे त्यांचेे कर्तव्य समजतात.


हिंदु मूलतत्त्ववादी : हिंदु मूलतत्त्ववाद्यांची श्रद्धा आहे की,ब्रह्मा (यालाच अनेक नावांनी ओळखले जाते)हाच एक खरा ईश्‍वर आहे;मात्र तो असा वैयक्तिक ईश्‍वर नाही की,जो केवळ त्याला मानणार्‍या लोकांचेच रक्षण करील आणि इतरांना नरकात ढकलेल.ब्रह्मा हे शुद्ध जाणिवेचे सूक्ष्मतम मूलतत्त्व आहे आणि ते चराचराला अन् प्रत्येकाला व्यापून आहे.या प्रत्येकाला म्हणजे तो कुठल्या धर्माचा असला किंबहुना नास्तिकही असला,तरी हे मूलतत्त्व त्यास व्यापून आहे.वेदांचे सार अहं ब्रह्मास्मि । (मी ब्रह्म आहे) असे आहे.

संस्कारांमुळे मूलतत्त्ववादी निर्माण होतात !

आता सर्वच धर्म म्हणतात की,एकच सर्वश्रेष्ठ ईश्‍वर आहे. त्याला इंग्रजीमध्ये गॉड,अरबी भाषेत अल्लाह आणि संस्कृत भाषेत ब्रह्म अशी नावे दिली आहेत.अर्थात् हाच ईश्‍वर सर्वज्ञानी असून विश्‍वाच्या अस्तित्वासाठी उत्तरदायी आहे.दुसरे काय असू शकणार ?हिंदूंना हेच कळत नाही की,मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा केवळ त्यांचाच ईश्‍वर (अनुक्रमे गॉड आणि अल्लाह)खरा आहे आणि तो केवळ त्याच धर्मातील लोकांचे रक्षण करतो अन् इतर धर्मांच्या आणि नास्तिकांना नरकात ढकलतो,या सिद्धांतावर ठाम विश्‍वास कसा असू शकतो ?सर्वसाधारण विवेकबुद्धी असलेल्या कुणालाही हा सिद्धांत पटणे शक्यच नाही.मात्र केवळ माझाच धर्म खरा आहे आणि त्याला न मानणारे सर्व वाईट आहेत,याच तत्त्वाचे वारंवार संस्कार जन्मापासून मनावर झाले,तर हा वरील सिद्धांत स्वीकारणे अशक्य नाही,असेच म्हणावे लागेल.माझ्यावरही जन्मापासून असेच संस्कार झाले होते की,केवळ ख्रिस्तीच ईश्‍वराचे लाडके पुत्र आहेत आणि स्वर्गात जाण्यासाठी ईश्‍वराने केवळ त्यांचीच निवड केली आहे.

ख्रिस्ती आणि मुसलमान मूलतत्त्ववाद्यांमुळे जगात संघर्षाचे वातावरण

आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की,ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांची संख्या प्रत्येकी १०० कोटींच्यावर आहे अन् ते एकमेकांसमोर उभे आहेत.एक गट म्हणतो,केवळ माझाच ईश्‍वर खरा आहे.आणि तुमचा त्याच्यावर विश्‍वास नसेल,तर तुम्ही नरकात जाल. आणि दुसरा गट ही असेच म्हणतो.ख्रिस्ती आणि इस्लाम धार्मिक मूलतत्त्ववादी आपापल्या मतावर निश्‍चल आहेत अन् त्यांना त्या धर्मातील धर्मगुरूंचे पाठबळ आहे.म्हणूनच जगात आज मोठ्या प्रमाणावर संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जग सुखी व्हावे,अशा प्रार्थना करणारा हिंदु धर्म !

अशा प्रकारे श्रेष्ठत्व गाजवण्यात हिंदु धर्म (सनातन धर्म)सहभागी होत नाही.तो अतीप्राचीन धर्म आहे.ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचा उदय होण्याआधीपासून हिंदुत्व अस्तित्वात आहे. हिंदु धर्मात ब्रह्म हा असा ईश्‍वर नाही की,तो कुठून तरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.तो प्रत्येकात (अंतर्मनात)आत्मा आणि प्रीती यांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.प्रत्येकाला मोक्षप्राप्तीचे ध्येय पटून ते सिद्ध होईपर्यंत (आणि त्यासाठी अनेक जन्मही घ्यावे लागले तरी)संधींची उपलब्धता करून देणे,यासाठी हे मूलतत्त्व कार्यरत असते.वसुधैव कुटुम्बकम् । (संपूर्ण पृथ्वी हे कुटुंबच आहे),तत्त्वमसि । (ते ब्रह्म तूच आहेस.),असे हिंदु धर्मग्रंथांत अनेक श्‍लोक आहेत.हिंदूंच्या प्रार्थना ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चिद् दुःखभाग्भवेत् ॥ (सर्व प्राणीमात्र सुखी आणि निरोगी होवोत.सर्वांचे कल्याण होवो.कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो.),अशा आहेत.

हिंदू त्यांच्या मूलतत्त्वाविषयी अज्ञानी !

अनेक हिंदूंना त्यांच्या धर्मातील मूलतत्त्वांची माहिती नाही.त्यांना केवळ कर्मकांडे,आवडत्या देवाची सकाम साधना आणि सण साजरे करणे म्हणजे धर्म,असेच वाटते.हिंदुत्वच सर्वव्यापी आहे,हे त्यांना कळत नाही.हिंदुत्व एका गटाला दुसर्‍या गटाच्या विरोधात भांडायला देत नाही.ते विज्ञानाला विरोध करत नाही.बुद्धीच्या वापराला केवळ अनुमतीच नव्हे,तर उत्तेजनही देते.

धर्म म्हणून हिंदुत्वाला मान्यता न देणारे पाश्‍चात्त्य !

याच कारणांनी पाश्‍चात्त्य देशात धर्म म्हणून हिंदुत्वाला मान्यता नाही.कारण त्यांच्या मते धर्म म्हणजे सिद्ध न होऊ शकणार्‍या मतप्रणालीवर आधारित असा आणि इतर धर्मांहून वेगळा,असा असतो.यामुळेच जगातील मानवजात एकोप्याने राहू शकत नाही.आता २१ व्या शतकात अशा सिद्ध न होऊ शकणार्‍या मतप्रणालीवर आधारित,हानीकारक मूलतत्त्व असणार्‍या तत्त्वांना तिलांजली देण्याची वेळ आली नाही का ?

हिंदु धर्माची मूलतत्त्वे अनुसरा !

यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे हिंदु धर्माची मूलतत्त्वे अनुसरणे.म्हणूनच चला,आपण सगळे हिंदु मूलतत्त्ववादी होऊया आणि प्रत्येक व्यक्ती,प्राणी अन् निसर्ग यांत ईश्‍वराचे अस्तित्व अनुभवूया.त्यामुळे सर्व जगाचे कल्याण होईल.

संदर्भ : MariaWirthBlog.wordpress.com


Multi Language |Offline reading | PDF