खिलजीचे उदात्तीकरण, हे इतिहासाचे विकृतीकरणच !

गेल्या अनेक दशकांत काँग्रेसने देशावर राज्य करून धर्मांधांना रान मोकळे करून दिले होते. त्याचाच परिपाक म्हणून देशात सातत्याने इतिहासातील क्रूर आणि अत्याचारी मोगल, सुलतान, तुर्क आदींचे वारंवार उदात्तीकरण होते. हिंदु राजांचे शौर्य आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांना सापत्न वागणूक मिळून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. टिपू सुलतानचे उदात्तीकरण आणि त्याची जयंती साजरी केली जाणे, ताजमहालाचा सत्य इतिहास दडपला जाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात केवळ काही ओळींतच अटोपणे, चित्रपटांतून विकृत इतिहास समाजासमोर पोहोचवणे, या सर्वांतून पद्धतशीरपणे भारताचे इस्लामीस्तान करण्याचे षड्यंत्र चालू आहे. चित्रपट अभिनेत्री करिना खान (करिना कपूर) यांनी स्वत:च्या मुलाचे नाव तैमूर ठेऊन क्रूर शासक तैमूरचे एकप्रकारे समर्थनच केले होते. काही दिवसांपूर्वी एका पोलीस निरीक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अनुमती देतो, तर टिपूच्या सुलतानच्या जयंतीलाही अनुमती द्यायला हवी, असे अल्पसंख्यांकधार्जिणे विधान केले होते. धर्मांध त्यांच्या मनाप्रमाणे न घडल्यास प्रत्येक वेळी हिंसक मार्ग अवलंबतात, तसेच पोलिसांनाही जुमानत नाहीत. यामुळेच कदाचित् टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास पोलिसांकडून विरोध होत नसावा. कर्नाटकात तर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी टिपूप्रेमींसाठी पायघड्या घातल्या आहेत.

टिपू सुलतानपाठोपाठ आता थडग्यातील अल्लाउद्दीन खिलजीलाही जिवंत करण्याचे प्रयत्न काही जणांकडून चालू आहेत. नुकतेच अलिगड मुस्लिम विद्यापिठातील इतिहास विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक सय्यद अली नदीम रजावी यांनी अल्लाउद्दीन खिलजीवर अन्याय झाला, असे विधान केले. याविषयी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, भारतातील सर्वांत ज्ञानी आणि विद्वान राजांमध्ये खिलजीचा समावेश आहे. भारतातील संस्कृतीची मुहूर्तमेढ खिलजीने रोवली होती, अशा शब्दांत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएन्यू) नजफ हैदर यांनीही अल्लाउद्दीनचे गोडवे गायले. इतिहासाचे प्राध्यापक रवी सोळंकी, उद्योग व्यवस्थापनाचे प्राध्यापक डॉ. मनोजकुमार यांनीही खिलजीचे कौतुक केले आहे.

प्रत्यक्षात अल्लाउद्दीन खिलजीने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले होते. मंदिरांची विटंबना केली होती. हा काळा इतिहास समोर येणे अधिक आवश्यक आहे. खिलजीच्या समर्थनार्थ केलेल्या दर्पोक्तींनी त्याच्या कुकृत्यांवर पांघरूण घातले जात आहे. भारतावर आक्रमणे करणार्‍या सत्तापिपासू आणि क्रूर सत्ताधीश यांचे असेच उदात्तीकरण चालू राहिले, तर पुढची पिढी त्यांनाच इतिहासातील नेते समजू लागेल. इतिहासाच्या अभ्यासातून भविष्यात साकारता येते. पुढील पिढीवर जर चुकीचे संस्कार झाले, तर भविष्य अंधारात जाण्याची भीती आहे. देशाच्या भवितव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही शासकांचे उदात्तीकरण करणार्‍यांना त्वरित रोखणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. समाजात सत्य इतिहास पोहोचावा, यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांवर चाप बसायलाच हवा. असे झाले, तरच उद्या भारत एक उज्ज्वल राष्ट्र ठरेल.

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल


Multi Language |Offline reading | PDF