६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या धनबाद येथील श्री. प्रदीप खेमका यांनी परात्पर गुरुदेवांचा कृतज्ञतापूर्वक वर्णिलेला महिमा !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

१. परात्पर गुरुदेवांच्या अपार कृपेची अनुभूती प्रत्येक क्षणी येणे

परात्पर गुरुदेव, आपल्या अपार कृपेची अनुभूती मला प्रत्येक क्षणी येते. माझ्या शरिराच्या पेशी पेशीवर आपले स्वामीत्व आहे. आपण मला आपल्या चरणी स्थान दिले. माझ्या पूर्व जन्मांंतील एकत्रित पुण्याचे वरदान म्हणून मला या जन्मी आपल्या चरणांची प्राप्ती झाली, याची प्रचीती मला प्रत्येक क्षणी येते. माझ्या उर्वरित जीवनातही आपली असीम कृपा मला प्रत्येक क्षणी प्राप्त करता येऊ दे, अशी आपल्या श्रीचरणी अखंड प्रार्थना आहे.

हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, हम भंवर में ही रहते ।

किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर हमें ला डुबोती ।

अगर तुम न होते, अगर तुम न होते ॥

श्री. प्रदीप खेमका

२. परात्पर गुरुदेवांनी साधकांचा हात घट्ट पकडला असल्याने आगामी भीषण काळातही साधक सुरक्षित रहाणार असणे

२ अ. पावसाळ्यात पुलावरून वेगाने पाणी वहात असतांना मुलीने वडिलांचा हात धरण्याऐवजी त्यांना स्वतःचा हात धरण्यास सांगणे : मला एका प्रसंगाचे स्मरण होत आहे, एकदा पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वहात होते. एक गृहस्थ त्याच्या मुलीला घेऊन घरी जात होते. वाटेत असलेल्या पुलावरून पाणी वेगाने वहात होते. सर्व लोक पुलावरून काळजीपूर्वक ये-जा करत होते. पुलाजवळ पोहोचताच त्या व्यक्तीने मुलीला सांगितले, तू माझा हात धर. त्यावर मुलगी वडिलांना म्हणाली, तुम्हीच माझा हात धरा. त्या व्यक्तीने मुलीला विचारले, मी तुझा हात धरला किंवा तू माझा हात धरलास, तर त्यामुळे कोणता फरक पडणार आहे ? मुलीने सांगितले, मी हात धरल्यास पाण्याच्या वेगाने माझा हात सुटू शकतो; पण तुम्ही माझा हात धरल्यास कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तो सोडणार नाही.

२ आ. येणारा काळ भीषण आहे; पण आपण सुरक्षित असणार; कारण आपला हात परात्पर गुरुदेवांनी पकडला आहे. त्यामुळे काळाचा प्रवाहही आमचे काही बिघडवू शकत नाही.

३. परात्पर गुरुदेवांनी आम्हाला आध्यात्मिक स्तरावर हिंदु राष्ट्र दिलेलेच आहे !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सेवेच्या निमित्ताने परात्पर गुरुदेव आमची साधना करून घेत आहेत, हे माझे सौभाग्य आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ शारीरिक, तसेच मानसिक स्तरावर आणण्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत; कारण परात्पर गुरुदेवांनी आम्हाला आध्यात्मिक स्तरावर हिंदु राष्ट्र दिलेलेच आहे, याची प्रचीती प्रत्येक क्षणी येते.

४. परात्पर गुरुदेवांनी घडवलेल्या संतांचे महत्त्व

४ अ. सनातनचे सर्व संत अद्वितीय असून त्यांची साधकांवर कृपा असणे : आपली प्रगती होऊन जीवनाचे कल्याण व्हावे, या हेतूने परात्पर गुरुदेवांनी अनेक संत मार्गदर्शन करण्यासाठी दिले आहेत. हे सर्व संत अद्वितीय आहेत आणि त्यांची आपल्यावर कृपा आहे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि अन्य सर्वच संत यांची आपल्यावर कृपा आहे.

४ आ. जीवनात परात्पर गुरुदेव, तसेच अन्य संत आहेत, तोपर्यंतच आपले जीवन सूर्यासमान आहे ! : आपल्याला जेव्हा संतांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासते, तेव्हा परात्पर गुरुदेव आपल्याला संतांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. जोपर्यंत आपल्या जीवनात परात्पर गुरुदेव, तसेच अन्य संत आहेत, तोपर्यंतच आपले जीवन सूर्यासमान आहे. श्रीकृष्ण वैकुंठ लोकात गेल्यावर निस्तेज झालेल्या अर्जुनाला भिल्लांनीही पराजित केले होते. त्याच प्रकारे केवळ परात्पर गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे आपण सर्व गोष्टी करू शकत आहोत. त्यांच्याच कृपेने सर्व होत आहे. आम्ही असमर्थ आहोत. आमची असमर्थता हीच आमची शक्ती आहे, असे मला आपल्या चरणांशी रहातांना प्रत्येक क्षणी वाटते. आपली अपार कृपा सर्व साधकांवर सतत राहो, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.

प्रार्थनारत, सदैव आपलाच,

– श्री. प्रदीप खेमका, धनबाद (२०.६.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF