एकुलत्या एक मुलीकडून कोणतीच अपेक्षा नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. अंजली काणे !

सौ. अंजली काणे
कु. गीतांजली काणे

१९.११.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. अंजली काणे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मुलाने किंवा मुलीने मला पूर्णवेळ साधना करायची आहे, असे सांगितले, तर बहुसंख्य आई-वडील तिला विरोध करतात आणि मायेत अडकवतात. साधिका म्हणून आणि आई म्हणून आपण आदर्श कसे असले पाहिजे, याचे उदाहरण सौ. अंजली काणे यांनी सर्व पालकांसमोर ठेवले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. स्वच्छतेची आवड आणि सतत कार्यरत असणे 

आई सतत कार्यरत असते. तिला कशाचा कंटाळा येत नाही. आई आणि मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात असतो. माझे बाबा प्रसारसेवेसाठी उत्तर भारतात असतात. ४ – ५ मासांनी (महिन्यांनी) आम्ही पुणे येथील घरी एकत्र जमतो. घरी कुणीच नसल्याने आणि घराच्या खाली खेळण्यासाठी मोठे मैदान असल्याने तेथून घरात धूळ येते. त्यामुळे आश्रमातून घरी गेल्या गेल्या बरीच स्वच्छता करावी लागते. आम्ही सकाळी सात वाजता घरी पोहोचतो. सर्व आवरायला संध्याकाळ होते. बाबा आणि मी आईला सांगतो, आपण टप्प्याटप्प्याने स्वच्छता करू. साहाय्यासाठी बाईला बोलवू; पण आईचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे पहिल्या दिवशीच घर पूर्ण स्वच्छ होते. घरातील स्पंदने पालटतात. तिच्या स्वच्छतेच्या आवडीमुळे पूर्वी आमच्या केंद्रातील साधकांनाही घरी आल्यावर चांगले वाटायचे.

१ आ. वेळ वाया न घालवणे 

तिला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे तिने दिवसा थोडा वेळ तरी विश्रांती घ्यावी, असे मला वाटते; पण तिला सेवेचा ध्यास असतो. दिवसा झोपून तो वेळ वाया घालवणे तिला आवडत नाही.

१ इ. काटकसरी 

आईला उधळेपणा आवडत नाही. ती प्रत्येक वस्तू योग्य दरात विकत घेते. ती पूर्वी अधिकोषात नोकरी करायची. जेथे चालत जाणे शक्य आहे, तेथे ती गाडी कधीच वापरत नाही.

१ ई. कामाप्रती निष्ठा

तिने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तेव्हा तिच्या १२५ सुट्या शिल्लक होत्या. अत्यावश्यक असल्याविना तिने कधी रजा घेतली नाही.

१ उ. वडिलांच्या अनुपस्थितीत घराचे पूर्ण दायित्व समर्थपणे सांभाळणे 

मी इयत्ता सहावीत असतांना आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. मी आठवीत असल्यापासून माझे बाबा आधी महाराष्ट्रात आणि नंतर उत्तर भारतात पूर्णवेळ प्रसारासाठी जायचे. त्या वेळी घराचे पूर्ण दायित्व आईने समर्थपणे सांभाळले. माझ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळी ती मला शाळेत, महाविद्यालयात सोडत असे. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ती नेहमी माझ्यासह यायची. घरातील सामान आणणे, देयके भरणे, अधिकोषातील कामे हे सर्व ती करत असे.

१ ऊ. आईने केलेल्या सेवा 

चिंचवड केंद्र प्रसाराच्या दृष्टीने बरेच विस्तारलेले आहे. घरी रहात असतांना या केंद्राचा ग्रंथसाठा, साप्ताहिक, निधीसंकलनाचा हिशोब, धर्मजागृती सभेच्या वेळी संतसेवा, प्रवचने, सत्संग घेणे, वैयक्तिक संपर्क करणे, अशा सर्व प्रकारच्या सेवा तिने केल्या आहेत. आईने केंद्रात अनेक वर्षे विज्ञापने आणण्याची सेवा केली आहे. पिंपरी आणि चिंचवड ही औद्योगिक शहरे आहेत. तेथे बरीच आस्थापने आहेत. आई आणि एक काकू दुचाकीवरून लांबच्या ठिकाणी जाऊन संपर्क करून विज्ञापने आणत असत. या संपर्कात त्यांची प्रतिमास ५ – ६ सहस्र रुपयांची ग्रंथविक्री होत असे. अनेक विज्ञापनदात्यांशी त्यांची जवळीक होती. समवेतच्या काकू कधी उपलब्ध नसल्यास ती एकटीच विज्ञापन किंवा अन्य संपर्क सेवेला जायची. अनेकदा ती ग्रंथप्रदर्शनासाठी ग्रंथ साठ्याची मोठी पिशवी, स्टँड किंवा फळा दुचाकीवरून एकटीच घेऊन जात असे.

१ ए. सेवेची तळमळ 

आश्रमातून घरी गेल्यावर बाबांना आणि मला अन्य ग्रंथ वाचूया, नवीन ठिकाणी फिरायला जाऊया, स्थानिक साधकांना भेटूया इत्यादी वाटत असते. आईला मात्र सेवेव्यतिरिक्त अन्य कुठलीच इच्छा नसते. आता आश्रमातून घरी गेल्यावर घरचे काम झाल्यावर ती लगेच भ्रमणसंगणक घेऊन सेवेला बसते. त्यामुळे घरी आम्हा तिघांपैकी तिचीच सेवा अधिक होते.

१ ऐ. मुलगी आणि पती यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसणे

१. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी आधी देवद आणि नंतर रामनाथी आश्रमात रहायला आले. बाबा प्रसारसेवेत असायचे. त्या वेळी ती ६ वर्षे घरी एकटी रहात असे. ती संपूर्ण दिवस सेवेत व्यस्त असे. मी वर्षातून दोनदा, तर कधी एकदाच घरी जायचे. त्या वेळी तिने मला किंवा बाबांना घरी येण्याचा किंवा आल्यावर अधिक दिवस रहाण्याचा कधीच आग्रह केला नाही. याचे कारण म्हणजे, सेवेचे महत्त्व तिच्या मनावर बिंबलेले आहे.

२. आईला मी वाणिज्य शाखेतून शिक्षण घ्यावे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ तरी नोकरी करावी, असे वाटायचे; पण मला कला शाखेतून शिक्षण घेण्यास आणि नंतर पूर्णवेळ साधना करण्यास तिने कधीच विरोध केला नाही.

३. आजही आई घरातील सर्व आवरून सकाळी आठ वाजता सेवेसाठी आश्रमात येते आणि रात्री आठ-साडेआठला परत जाते. मी घरी यावे आणि रहावे, अशी तिची कोणतीच अपेक्षा नसते. मी प्रतिदिन रात्री आठ वाजता घरी गेल्यास माझी सेवा अल्प होईल. तसे व्हायला नको, असा तिचा विचार असतो.

४. बहुतांशी सर्व आईंना आपल्या मुलीचे लग्न व्हावे आणि ते झाले की, आपण एका मोठ्या दायित्वातून मुक्त झालो, असे वाटत असते; पण आईला असे वाटत नाही. तिने मला साधना करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. मी तिच्यासाठी, घर आणि नातेवाइक यांच्यासाठी काही करावे, अशी तिची कोणतीच अपेक्षा नाही. साधक-पालकांमध्येही इतकी निरपेक्ष वृत्ती क्वचितच आढळते. आता मला आईचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. मी तिच्यामुळेच आनंदाने पूर्णवेळ सेवा करू शकत आहे.

१ ओ. प्रेमभाव

आम्ही गोवा येथे नुकतीच सदनिका घेतली आहे. तेथून आश्रमात दुचाकीवर येतांना एखादा साधक/साधिका चालत येत असल्यास ती त्यांना दुचाकीवर घेऊन येते. आईची प्रकृती नाजूक आहे. तिच्या दृष्टीने गाडीवर अधिक वजन पेलणे कठीण आहे; पण तिला हे प्रेमभावामुळे जमते.

१ औ. साधकांनाही आईविषयी आपुलकी असणे 

आईचा स्वभाव अबोल असल्यामुळे ती मोजक्या साधकांशी थोडेफार बोलते. त्यापुढे काय बोलायचे ?, ते तिला कळत नाही, तरीही ती पुण्याला घरी गेल्यावर प्रतिदिन तीन साधक आई कुठे आहे ?, अशी माझ्याकडे तिच्याविषयी विचारपूस करतात. त्यामुळे ती फार कुणाशी बोलत नसली, तरी अनेकांना तिच्याविषयी आपुलकी आणि कौतुक आहे, हे जाणवते.

१ अं. कठीण प्रसंगातही खंबीर रहाणे 

एकदा आई सेवेसाठी दुचाकीवरून जातांना तिचा अपघात झाला. ती पडली आणि तिच्या पायाला मोठी जखम होऊन बरेच रक्त गेले. तेथून जाणार्‍या लोकांनी तिला गाडी उचलायला साहाय्य केले. एवढे लागले असतांनाही ती तशीच दुचाकीवरून आधुनिक वैद्यांकडे जाऊन घरी आली. पायाला लागल्यामुळे तिला चालता येत नव्हते. मुंबईला माझी मावशी रहाते. तिने पुण्याला येऊन गाडीतून तिला मुंबईला घरी नेले.

१ क. पायाला दुखापत झालेली असतांना मुलीला घरी न येता सेवेलाच प्राधान्य द्यायला सांगणे

तिला घरातसुद्धा चालता येत नव्हते. माझ्या आजोबांना आई, बाबा आणि मी तिघे वेगवेगळ्या ठिकाणी रहातो, हे आवडत नसे. मी घरी आल्यास आईला बरे वाटेल; म्हणून मी घरी यावे, अशी त्यांची अपेक्षा होती; पण आई मला सांगायची, तू घरी येऊ नकोस. त्याची आवश्यकता नाही. तू आश्रमात सेवाच कर. येथे येऊन सेवेचा वेळ जाईल. तिचा पाय बरा व्हायला दोन मास लागले.

१ ख. आईच्या तळमळ या गुणामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिची विचारपूस केल्याचे जाणवणे

एकदा मला प.पू. डॉ. नी विचारले, आई आता बहिणीकडे रहाते का ? मी हो म्हणून तिचा अपघात झाल्याचे सांगितले. ते हसून म्हणाले, काळजीचे काही कारण नाही. आईमधील तळमळीमुळे ते तिची विचारपूस करत असत असे मला जाणवले.

१ ग. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा

१. गोव्याहून पुण्याला येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी गोवा एक्सप्रेस ही रात्रीची गाडी आहे. संध्याकाळी गाडीत बसले की, दुसर्‍या दिवशी पहाटे ३ – ४ वाजता पुणे स्थानकावर पोहोचतो. तेथून एक घंट्याने चिंचवडला जाण्यासाठी लोकल आगगाडी असते. अनेकदा हा प्रवास मी एकटीने केला आहे; पण तिला कधी माझी काळजी वाटली नाही.

२. आश्रमात आल्यावर आरंभी १ – २ वेळा घरी जातांना माझ्याकडे भ्रमणभाष नव्हता, तरीही तिने मला कधी प्रवास करण्यापासून अडवले नाही किंवा समवेत कुणीतरी असायलाच हवे, असा आग्रह धरला नाही.

३. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना जिल्ह्यात लेखा सेवेचे शिबीर असल्यास ती काही दिवस सेवेच्या ठिकाणी रहाण्यास जात असे. त्या वेळी मला साधकांकडे रहाण्यापेक्षा घरी राहून अभ्यास करणे आवडत असे. त्यामुळे मी घरी एकटी रहायचे. तेव्हा तिने माझी अनावश्यक काळजी करून सेवेला जाणे रहित केले, असे कधी झाले नाही. या प्रसंगांतून तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर असणारी दृढ श्रद्धा दिसून येते.

२. कृतज्ञता आणि प्रार्थना

श्री गुरुराया, तुम्ही मला स्वावलंबी, त्यागी, चांगले संस्कार करणारी, साधना करण्यासाठी भक्कम पाठिंबा देणारी साधक-आई दिलीत, त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. तिचे गुण मला आत्मसात करायला शिकवा. तुमच्याप्रती तिच्यात पुष्कळ भाव आहे. तुमचा विषय निघाल्यावर तिचे डोळे पाणावतात. भावनाशीलता, चुकांची भीती वाटणे, इतरांचे दोष बघणे आणि त्याचा स्वतःला त्रास करून घेणे, मनमोकळेपणाचा अभाव या अंतर्गत शत्रूंवर मात करण्यासाठी तिला शक्ती द्या. तुमच्या आश्रयाला असणार्‍या जिवांचा उद्धार निश्‍चित आहे. तुमच्या कृपेमुळेच मनमोकळेपणाचा अभाव या साधनेत घातक असणार्‍या अहंच्या पैलूसाठी तिने प्रयत्न चालू केले आहेत. देवा, आम्ही तुला पूर्ण शरण आलो आहोत. तू जसा आम्हाला क्षणोक्षणी आनंद देत असतोस, तसा आम्हालाही तुला द्यायचा आहे. तूच आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी, मनपुष्प समर्पित करण्यासाठी जलद प्रयत्न करवून घे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.

– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०१७)

 

 

 


Multi Language |Offline reading | PDF