हास्य हे आजारातून मुक्त होण्याचे सर्वोत्तम औषध आहे ! 

सौ. प्रमिला केसरकर

२५ आणि २६.८.२०१७ या दोन दिवसांत सकाळी उठल्याउठल्या हस्तप्रक्षालनपात्राकडे (बेसीनकडे) गेल्यावर मला आरशातील स्वत:च्या प्रतिमेकडेे बघून आपोआप हसायला येऊ लागले. त्या वेळी माझ्या असे लक्षात आले की, आरशातील माझी प्रतिमा हसतांना चांगली आणि प्रसन्न दिसते. ‘त्या प्रतिमेकडे परत परत बघावे आणि तिच्याकडे पाहून हसावे’, असा विचार माझ्या मनात आला; पण मी ती कृती करण्याचे टाळले. मी आरशात पहायचे टाळले, तरी ती प्रतिमा मी आरशात न बघताही माझ्या दृष्टीसमोर पुन:पुन्हा येते आणि मला हसायला लावते. त्या वेळी मला चांगलेही वाटते; पण मला याचा अर्थ कळला नाही.

२६.८.२०१७ या दिवशी सकाळी मी आगाशीत बसले असतांना मला कोणीतरी सांगत होते, ‘अगं प्रमिला, थोडे तरी हस !’ तेव्हा पुन्हा मी हसले; पण मला असे कोण सांगत आहे, ते कळत नव्हते. ‘त्या हसणार्‍या प्रतिमेचा विचार सारखा मनात का येतो’, याचा मला उलगडा होत नव्हता; म्हणून मी मला हसायला सांगणार्‍या त्या प्रतिमेला विचारले, ‘मला असे हसायला कोण सांगत आहे ?’ तेव्हा ती म्हणाली, ‘मी प्रमिला आहे. तुला सकाळी जी सुंदर प्रतिमा आरशात दिसते, तीच मी आहे’. मी ‘हो का ?’, असे म्हणून थोडा वेळ शांत बसून विचार करत असतांना पुन्हा आतून आवाज आला, ‘विचार करू नकोस. तुला माझी भीती वाटते का ?’ मी म्हटले, ‘नाही. तुझ्याकडे पाहून मला चांगले आणि प्रसन्न वाटते.’ तेव्हा पुन्हा ती मला म्हणाली, ‘मग विचार करू नकोस. हसत रहा’. तेव्हा ‘हे सांगणारी आणि हसवणारी प्रतिमा खरोखर चांगली आहे’, याची मला निश्‍चिती झाली. मी तिला पुन्हा प्रश्‍न विचारला, ‘असे आहे, तर बाहेर जी प्रमिला आहे, ती फारच अल्प हसते आणि आतली प्रमिला पुष्कळ छान आणि प्रसन्न हसते. आतील प्रतिमेकडे बघून बाहेरची प्रमिला हसत असते. हे कसे ?’ पुढे मी त्या प्रतिमेला सांगितले, ‘मलाही तुझ्यासारखीच प्रसन्न बनव.’ तेव्हा ती म्हणाली, ‘हो. त्यासाठीच माझे हे प्रयत्न आहेत; पण मी जेव्हा जेव्हा सांगेन, तेव्हा तू हसायचेस. तुला हे मान्य आहे का ?’ मी ‘हो’ म्हटले. तेव्हा ती म्हणाली, ‘तुझ्या आतील प्रतिमेसारखीच तू हळूहळू बाहेरूनही तशीच सुंदर दिसायला लागशील; पण त्यासाठी जलद प्रयत्न करायला हवेत’. पुढे ती म्हणाली, ‘मनमोकळे हसल्यावर सर्व नकारात्मकता निघून जाते आणि शरिरातून आजार चक्क पळ काढतो. आजारातून मुक्त होण्यासाठी ‘हास्य’ हे खरोखर सर्वोत्तम औषध आहे.’

प.पू. गुरुमाऊलीने दिलेल्या या अनुभूतीसाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

–        सौ. प्रमिला रामदास केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०१७)

 


Multi Language |Offline reading | PDF