राजकारणाच्या पलीकडे जाऊन हिंदूंनी संघटित व्हावे !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी पत्रकारांसह साधलेल्या संवादामध्ये मांडलेले प्रखर विचार

जळगाव येथे १९ नोव्हेंबरला झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेपूर्वी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी जळगाव येथे वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. राष्ट्र-धर्महिताची ज्वलंत भावना असणारे अधिवक्ता पुनाळेकर यांनी यापूर्वीही स्वत:ची मते परखडपणे मांडली आहेत. या चर्चेत मांडलेले विचार हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीला राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी दिशादर्शक आहेत. हे विचार आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. ब्रिगेडी विचारसरणीचा हिंदुद्रोह

१ अ. औरंगजेबाचे उदात्तीकरण का ?

ब्रिगेडी विचारसरणी असणार्‍यांनी जातींमध्ये फूट पाडण्यापेक्षा मराठ्यांवर होणार्‍या अन्यायाविषयी बोलावे. ज्याने संभाजी महाराजांची निष्ठुर हत्या केली, त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण का केले जाते ? सर्व सूत्रे ब्राह्मणांच्याच विरोधात का ? ठिकठिकाणी हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांचे ब्रिगेडी उघड समर्थन करतात.

१ आ. शाकाहाराच्या अटीला विरोध करणारे सच्चर आयोगाच्या शिष्यवृत्तीच्या अटींविषयी गप्प का ?

पुणे येथील माता सावित्रीबाई विद्यापिठातील शिष्यवृत्तीसाठी शेलार नावाच्या व्यक्तीने शाकाहाराची दिलेली अट वैयक्तिक होती. शाकाहारी ही एक जीवनपद्धत आहे. मुसलमानही शाकाहारी होऊ शकतो. याउलट सच्चर आयोगाच्या शिष्यवृत्त्या सरकार देते. त्यामध्ये मुसलमान, ख्रिस्ती, शीख, जैन, पारशी या सर्वांना शिष्यवृत्ती देण्यात येते; मात्र केवळ हिंदूंना वगळले जाते. शेलार यांनी दिलेली शिष्यवृत्ती काही सहस्र रुपयांची आहे, तर सच्चर समितीची शिष्यवृत्ती अडीच लाख रुपयांची आहे. शाकाहाराच्या अटीला विरोध करणारे या सूत्रावर बोलत नाहीत. मराठा समाजाविषयी इतका कळवळा असेल, तर हे सूत्र घ्यावे. याविषयी बोलत नाहीत, म्हणजे ते कुणाचे हस्तक आहेत ?

१ इ. संभाजीनगर नावाला विरोध करणारे आयएस्आयचे हस्तक !

जातीयवादी संघटना सातत्याने बुद्धीभेद करत आल्या आहेत. अफझलखानवधाचे चित्र उभे करायला विरोध होतो, याविषयी यांना काहीही म्हणायचे नाही. औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव देण्यास त्यांचाच अधिक विरोध आहे, हा मोठा विरोधाभास आहे. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची हत्या झाली, त्या ठिकाणाचे नाव संभाजीनगर ठेवायचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ही विकृती असून ते आयएस्आयचे हस्तक आहेत.

१ ई. आर्थिक घोटाळे उघड झाल्यास जातीयवादी हे कारागृहात जातील

सरकार जातीयवादी संघटनांवर लक्ष ठेवत नाही. त्यांचे कार्यकर्ते विविध क्षेत्रांत उच्च पदांवर आहेत. त्यांना नोकर्‍या कुणी दिल्या? हे कार्यकर्ते कुठून आले ? विष पसरवणे हे त्यांचे काम आहे. अशा संघटनांवर बंदी आणायला हवी. यांचे आर्थिक घोटाळे उघड झाले, तर हे कारागृहात जातील.

२. लव्ह जिहादमध्ये फसणार्‍या हिंदु युवतींना भोगाव्या लागणार्‍या मरणप्राय यातना !

२ अ.  हिंदु मुलीने मुसलमान धर्म स्वीकारला नाही, तरी तिची संपत्ती तिच्या मुसलमान मुलांना मिळते; मात्र मुसलमान धर्म न स्वीकारल्यास हिंदु मुलीला संपत्तीचा भाग मिळत नाही !

विशेष कायद्याखाली (स्पेशल अ‍ॅक्टनुसार) स्वत:चा धर्म ठेवून हिंदु मुलीने मुसलमान युवकाशी लग्न केले, तरी त्यांची मुले मुसलमान रहातात. मुलांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर त्यांना वडिलांची संपत्ती मिळत नाही; मात्र हिंदु महिलेची संपत्ती त्यांना मिळते. हा कायदा समानतेच्या विरोधात आहे; कारण तो स्त्रीचा अधिकार काढून घेतो. याची बीजे इस्लाममध्ये आहेत. हिंदु युवकाशी मुसलमान युवतीने लग्न केल्यास त्यांच्या मुलांनी इस्लाम धर्म स्वीकारला, तरी हिंदु वडिलांची संपत्ती त्यांना मिळते. हिंदु धर्म भेदभाव करत नाही; मात्र इस्लाममध्ये भेदभाव आहे. त्यामुळे हिंदु मुलीने मुसलमान युवकांशी लग्न करण्याला आमचा विरोध आहे.

मुसलमानांनी हिंदु मुलगी केली; म्हणून आम्ही मुसलमान मुलीला आणणे, या मताचे आम्ही नाही. हिंदु मुलगी इस्लामध्ये गेल्यावर ती कुटुंबापासून तोडली जाते. त्यामुळे तिला वाटेल तसे वागवले जाते. तलाक झाल्यावर तिच्यावर दीर हात टाकतो. महिलेचे मूल लहान असेल, तर सासरा किंवा दीर तिचे मूल काढून घेऊ शकतो. काही प्रकरणांत वासनांध सासरा किंवा दीर यांची वासनापूर्ती करण्याची वेळ विधवा महिलेवर येते. त्यामुळे हिंदु मुलींनी मुसलमान युवकाशी लग्न करू नये.

२ आ. संस्कार आणि जनजागृती आवश्यक !

आज हिंदु मुली वाट्टेल तसे कपडे घालतात. आई ओरडली, तरी ऐकत नाहीत; मात्र इस्लाममध्ये गेल्यावर त्यांना बुरखा घालावा लागतो. हा प्रश्‍न कायद्याने सुटणार नाही. याविषयी जनजागृती करायला हवी. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यास हा प्रश्‍न सुटेल. यासाठी संस्कार व्हायला हवेत. संस्कार ही पुढची गोष्ट आहे; मात्र हिंदु मुलींना इस्लाममधील प्रथांविषयी माहितीही नाही. याविषयी जागृती आवश्यक आहे; कारण इस्लाम स्वीकारलेल्या हिंदु मुलींचे हुंकार बाहेर पडतच नाहीत.

२ इ. तिहेरी तलाक जायला हवा !

अजूनही तिहेरी तलाक गेलेला नाही. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता तीन वेळा तलाक असे म्हणून घटस्फोट देता येणार नाही; मात्र नेहमीच्या पद्धतीनुसार घटस्फोट देऊ शकतात. मुसलमान युवक ४ विवाह करू शकतो.

३. पद्मावती चित्रपट कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही !

३ अ. लोकांच्या भावनांशी खेळणार्‍यांवर शासनाने बडगा दाखवावा !

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्डाची) मान्यता मिळाली नसतांना पद्मावती चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. अशा प्रकारे प्रक्षेपण करणार्‍याला ३ मासांची शिक्षा आहे. तुम्ही काय देश विकत घेतला आहात का ? केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे अंतिम आहे. अशा प्रकारे तुम्ही इतिहासात पालट करून दाखवू शकत नाही. जे आहे, ते आहे. कलेच्या नावाखाली तुम्ही वाटेल, ते दाखवून भावनांचा अपमान करत असाल, तर लोकांच्या श्रद्धेवर तुम्ही आघात करत आहात. याविषयी शासनाने बडगा दाखवायला हवा.

३ आ. अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी कायद्याचे आवाहन नागरिकांना नव्हे, तर विजय मल्ल्या याला करावे !

देशाचा ९ सहस्र कोटी रुपयांचा कर बुडवणार्‍या विजय मल्ल्या याच्या साहाय्याने मोठ्या झालेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नागरिकांना कायदा पाळण्याचे आवाहन करू नये. तिने प्रथम विजय मल्ल्या याला हा उपदेश करावा. त्यांची विचारस्वातंत्र्याची कल्पना भोगवादी आणि चंगळवादी आहे.

३ इ. …तर चित्रपटगृहांचे परवाने रहित करायला लावू !

सेन्सॉरच्या अनुमतीविना पद्मावती चित्रपट प्रक्षेपित केला, तर ठिकठिकाणी थेट आंदोलने करावी लागतील. तुम्ही जर देशातील कायदा पाळणार नसाल, तर तुम्हाला लोकांच्या रोषाची झळ सहन करावी लागेल. चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहाचा परवाना रहित करायला लावू. चित्रपटगृहांना आम्ही काम करू देणार नाही.

३ ई. खटले लढवण्यास आम्ही सिद्ध !

जेथे जेथे आमचे अधिवक्ते आहेत, तिथे तिथे आम्ही लढू आणि जनआंदोलन करू. यामध्ये हिंसा झाल्यास ते खटलेही आम्ही लढू. कायदा मोडणार्‍या व्यक्तीला कुणी पाठीशी घालत असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही.

३ उ. कुणाचा रोष पत्करायचा हे शासनाने ठरवावे !

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अनुमती दिल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन होईल. आम्ही कायद्यालाच आव्हान देऊ. लोकांच्या भावना तुम्ही जपल्या पाहिजेत. आता सरकारने ठरवायचे आहे, स्वत:वर रोष घ्यायचा कि त्यांच्यावर ढकलायचा ? पद्मावती चित्रपट कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही.

४. योगी आदित्यनाथ राममंदिर उभारणार !

४ अ. शासनाने भूमी संपादित केल्यास राममंदिराचा वाद सुटेल !

राममंदिराचा वाद हा भूमीचा वाद आहे. तेथील महंत आणि मुसलमान ही भूमी आपापली आहे, असे म्हणत आहेत. शासनाने ही भूमी संपादित केली, तर या भूमीवर ना महंतांचा हक्क राहील, ना मुसलमानांचा ! आपोआप ही भूमी शासनाकडे येऊन न्यायालयाचा निरुपाय होईल. त्यामुळे भूमीविषयी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका प्रविष्ट आहे, तिचा पायाच उखडला जाईल. हिंदु विधीज्ञ परिषद याविषयी काही टिप्पणी करून पाठवत आहे. श्रीराम हे भारतीय समाजाचा आदर्श आहेत. रस्त्यासाठी भूमी संपादित करता येऊ शकते, तर राममंदिरासाठी का होऊ शकत नाही ? हे सूत्र अजूनपर्यंत पुढे आले नाही, ते आम्ही आणू. योगी आदित्यनाथ तेथे मंदिर नक्की बांधतील. त्यासाठी जागृती आणि कायद्याच्या दृष्टीने आम्ही साहाय्य करू.

४ आ. सोमनाथ मंदिराप्रमाणे राममंदिरही होईल !

या देशाला श्रीरामाचे मंदिर हवे आहे. या देशात श्रीरामाचे स्वागत होणार नसेल, तर कुणाचे होणार ? एकेकाळी नेहरू आणि पटेल यांनी सोमनाथाचे मंदिर बांधले होते, तसे राममंदिरही बांधले जाईल.

५. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर अनन्वित अत्याचार करणार्‍या परमवीरसिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवण्याची शिफारस करणे हे हिंदूंसाठी वेदनादायी !

ज्या परमवीरसिंह यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना स्वत: पट्ट्याने मारले, अश्‍लील ध्वनीचित्रफिती दाखवल्या, शॉक दिला, आई-वडिलांवरून घाणेरड्या शिव्या दिल्या, अशा परमवीरसिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवण्याची शिफारस करण्यात येत असेल, तर अशा देशद्रोही मंडळींना काय म्हणावे ? मग ते कोणत्याही पक्षातील असोत. असे निर्णय हिंदूंना वेदना देते.

६. मंदिरांतील गैरप्रकारांना शासन उत्तरदायी !

६ अ. मंदिरांतील पैसा धर्मकार्यासाठी वापरावा !

हिंदूंच्या मंदिरांतील पैसा काढून तो धर्मादाय रुग्णालये, जलयुक्त शिवार यांसारख्या शासकीय योजनांसाठी वापरला जातो, हे योग्य नाही. हे सरकारचे काम आहे, मंदिरांचे नाही. शासकीय योजनांसाठी शासनाने भ्रष्टाचार्‍यांकडून पैसा वसूल करावा आणि तो रुग्णालयांना द्यावा !

६ आ. पगारी पुजारी नेमण्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट करणार !

पुजार्‍यांना पगार मिळणार असेल, तर ते ठीक आहे; मात्र पगारी पुजारी नेमण्याची भाषा करणार्‍या शासनाने प्रथम वेदपाठशाळा काढायला हव्यात. मंदिरात येणारा पैसा हा वेद मानणार्‍यांचाच आहे. आमचा पगारी पुजार्‍यांना विरोध आहे. याविषयी आम्ही याचिका प्रविष्ट करणार आहोत.

६ इ. धनदांडगे झालेल्या देवस्थानच्या विश्‍वस्तांचे अन्वेषण व्हायला हवे !

मंदिरांच्या विश्‍वस्तांकडे माहिती मागितली, तर ते सांगतात, आम्ही माहितीच्या अधिकारात येत नाही. तुम्ही मंदिराचा पैसा वापरणार, सगळे अधिकार घेणार; मात्र माहितीच्या अधिकारात येणार नाही, हे अयोग्य आहे. विश्‍वस्तांनी मंदिरांच्या भूमी लाटल्या, भ्रष्टाचार केला, तरी त्यांच्यावर फौजदारी खटला होत नाही. दुपारी चार नारळ घरी घेऊन जाणार्‍या पुजार्‍यांच्या मागे प्रसारमाध्यमे लागतात; मात्र मंदिराचे विश्‍वस्त कोण आहेत ? ते धनदांडगे झालेत, देवस्थानच्या भूमीची क्षुल्लक किमतीला विक्री केली, याची प्रसारमाध्यमांनी पडताळणी करायला हवी.

७. हिंंदुत्वाचा राजकारणाशी संबंध नाही !

आमचे म्हणणे आहे की, हिंदू म्हणून एकत्र या ! स्थानिक वाद हे राजकीय वाद आहेत. जर धर्मांधांकडून आक्रमण झाल्यास शिवसेना-भाजप यांनी एकमेकांसाठी धावून गेले पाहिजे. आम्ही कुणा पक्षाचे नाही, आम्ही सर्वांसाठी आहोत. एखादा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि हिंदूंसाठी धावून येत असेल, तर तोही आमचाच आहे. आम्ही पक्ष मानत नाही. पक्षीय भेद असणारच. कुणी निवडून येईल, कुणी पडेल. हे चालूच रहाणार. आम्हाला कायम मैत्री हवी आहे. सर्व पक्ष राजकीय हिंदुत्वाकडे जात आहेत. आमचा राजकीय हिंदुत्वाला विरोध आहे. हिंंदुत्वाचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारणाच्या पुढे जाऊन हिंदूंचे संघटन व्हायला हवे.

 


Multi Language |Offline reading | PDF