मुख्य प्रवाहाच्या विरोधात !

संजय लीला भन्साळी देशात त्यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू शकत नसतील, तर त्यांनी बंगालमध्ये येऊन तो प्रदर्शित करावा. बंगाल त्यांचे स्वागत करील. येथे ते चित्रपटाचा प्रिमियरही करू शकतात, असे आवाहन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भन्साळी यांना एका कार्यक्रमात केले. म्हणजे जे अपेक्षित होते, ते ममता बॅनर्जी यांनी केले. पद्मावती चित्रपटावरून देशभर उठलेले वादळ, उलटसुलट प्रतिक्रिया, पुरोगामी, निधर्मी, देशद्रोही आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांचे चित्रपटाला लाभलेले समर्थन या पार्श्‍वभूमीवर ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया कधी व्यक्त झाली नव्हती. आता त्यांनी भन्साळी यांना थेट निमंत्रित करून बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ असा होत आहे की, देशभरातील जनता एका बाजूला आणि ममता बॅनर्जी दुसर्‍या बाजूला. देशातील वातावरण असे आहे की, या चित्रपटाला चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळणे कठीण गोष्ट होऊन बसली आहे. राजपुतांच्या पर्यायाने हिंदूंच्या संघटनाचा हा परिणाम आहे. राणी पद्मिनीचा इतिहास कोणाला ठाऊक नाही ? जोहार हा शब्द राणी पद्मिनीमुळे लोकांना ठाऊक झाला. जोहार हे दिव्य राणींच्या त्यातील सहभागामुळे पुढील पिढ्यांना भावले आहे. लोकांच्या मनात त्यामुळे राणींना वेगळे स्थान आहे. अशा राणींचा चित्रपटाद्वारे होत असलेला उपमर्द लोकांना सहन होत नाही. त्यामुळेच देशभर या चित्रपटाला विरोध होत आहे. भारतीय संस्कृतीचा अभिमान, इतिहासाचा अभिमान आणि यांद्वारे प्रदर्शित होत असलेला देशाभिमान हे सर्व एकत्र झाल्यामुळे विरोधाची तीव्रता अधिक आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना मात्र त्याची पर्वा नाही. राष्ट्रीय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे, हेच त्यांचे धोरण असल्यामुळे आज त्या भन्साळी यांना कोलकाता येथे त्यांचा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करण्याचे आवाहन करत आहेत. भारतीय इतिहासात राजस्थानच्या राजपूत राजांचे स्थान मोठे आहे. भारतावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना किंवा इतर आक्रमकांना त्यांनी जिवापार शह दिला आहे. भारतीय भूमीच्या रक्षणासाठी त्यांनी विविध प्रकारे त्यागच केला आहे. भारतीय महिलांसाठी शीलाचे रक्षण महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने राणी पद्मावती भारतीय महिलांचा आदर्श आहे. याच कारणामुळे या चित्रपटाला विरोध होत आहे, ही गोष्ट ममता बॅनर्जी त्यांच्या मनमानी स्वभावामुळे आणि अहंमुळे मान्य करत नाहीत. देशाच्या पंतप्रधानांना नेहमीच आव्हान देण्याच्या भूमिकेत असणार्‍या ममता बॅनर्जी इतर कोणाची पर्वा करतील, अशी अपेक्षा करता येत नाही. राष्ट्रीय धोरणांना उघड विरोध करून त्या देशद्रोह्यांप्रमाणे का वागत आहेत ? असा प्रश्‍न देश-विदेशातून विचारला जात आहे. पाकमधून येणार्‍या कलाकारांचे पण बंगालमध्ये स्वागत केले जाईल, असेही त्या म्हणत आहेत. त्यांची ही आडमुठी भूमिका देशात कलहाचे वातावरण निर्माण करू पहात आहे. अर्थात् पद्मावती चित्रपटाच्या निमित्ताने दिसत असलेले भारतियांचे संघटन ममता बॅनर्जी यांच्या अहंकारी वृत्तीला पायबंदी घालील, अशी अपेक्षा करता येते. मध्यंतरी प्रत्येक भारतियाने त्याच्या भ्रमणभाषशी स्वतःचे आधार कार्ड जोडण्याविषयीची सूचना केंद्र सरकारने दिली, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आणि स्वतः ते करणार नाही; कारण वैयक्तिक माहिती उघड होण्याची भीती त्यात आहे, असे त्यांनी सांगितले. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशी कोणती वैयक्तिक माहिती लोकांपासून लपवायची आहे ? असे राजकीय नेते लोकराज्यात जनतेला घातक आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहाणे आवश्यक आहे. पंतप्रधान त्या दृष्टीने सतर्क असतील, असे आपण म्हणू शकतो. बंगाल राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशमधून बंगालमध्ये घुसखोरी करणार्‍या धर्मांधांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोणतीही उपाययोजना आखत नाहीत. सीमा भागातील परिस्थितीचा वार्षिक आढावा घेणार्‍या भारतीय सैन्याला ममता बॅनर्जी रोखतात आणि केंद्रशासनावर शत्रूप्रमाणे आरोप करतात. जणूकाही बंगाल म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ताच ! त्यांचे हे वागणे पाकसारख्या देशाला सुखावणारे असते. वर्ष १९७१ मध्ये भारतीय सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान पाकच्या राजवटीपासून तोडून बांगलादेश निर्माण केला. या घटनेमुळे दुखावला गेलेला पाकिस्तान भारतामध्ये अस्थैर्य आणि हिंसाचार माजवण्याच्या प्रयत्नांत असतो. बंगालच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणारे नेते पाकला हवेसेच वाटणार ! म्हणजे ममता बॅनर्जी भारतीय शासनाला स्वतःचे कर्तृत्व दाखवण्याऐवजी पाकच्याच शासनाची शाबासकी मिळवण्यात धन्यता मानत आहेत. काश्मीर जसा फुटीरतावाद्यांनी भरलेला आहे, तसा बंगालही आता ममता बॅनर्जी यांच्यामुळे तसा वाटू लागला आहे. ममता बॅनर्जी यांनी भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाला पाठिंबा देऊन आपण देशाच्या मुख्य प्रवाहात नाही, हे परत एकदा दाखवून दिले आहे.

संस्कृतीच्या रक्षणासाठी !

पद्मावती चित्रपटाच्या संदर्भात देशात विरोधी वातावरण आहे. भारतीय संस्कृतीची विटंबनाच या चित्रपटामुळे होत आहे. जगातील कोणताच देश स्वतःच्या संस्कृतीची विटंबना होऊ देत नाही. प्रत्येक देशाचा असा गुणधर्म असणे स्वाभाविक आहे. भारतामध्ये मात्र वाटेल ते चालवून घ्यावे, अशी अपेक्षा करणारे भारतीयच आहेत. यांना पाश्‍चात्य संस्कृतीने झपाटून टाकले आहे, असे म्हणता येते. हे असे सहन करण्याची अपेक्षाच कशी केली जाते ? मुठभर लोकांसमोर कोट्यवधी लोकांनी वाकावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही का ? भारताला जशी पुरातन संस्कृती आहे, तसा उज्ज्वल असा इतिहासही आहे. भारतियांसाठी या अभिमानास्पद गोष्टी आहेत. नेमक्या याच गोष्टींवर घाला घालण्याचा प्रकार म्हणजे हेतूपुरस्सर रचलेले षड्यंत्रच होय. त्याविरोधात सर्व भारतियांनी उभे रहाणे नैतिकतेला अमान्य नसेल !

 

 


Multi Language |Offline reading | PDF