भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला सत्ता हस्तांतरण करार अन् त्यामागील तथ्य !

जळगाव येथील हॉटेल रॉयल पॅलेस येथे २० नोव्हेंबरला भारत शासनाचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ट्रान्स्फर ऑफ पॉवर (सत्ता हस्तांतरणाचा कायदा) यासंदर्भात काही तथ्ये समोर आणली. ती देत आहोत.

जून १९४७ मध्ये ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याविषयी विधेयक पारित केले आणि सत्ता हस्तांतरण झाले. त्या काळी इंग्रज आणि भारतीय नेते यांच्यात बैठका झाल्या. सत्ता हस्तांतरण कायद्यातील काही धोरणांनुसार भारत स्वातंत्र्योत्तर काळातही इंग्रजांच्या स्वाधीन राहिला. त्याला सर्वस्वी देशहिताची कळकळ नसलेले राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत.

१. सत्ता हस्तांतरणाच्या करारात भारत इंग्रजांंच्या विरुद्ध लढणार्‍यांना युद्धकैदी (वॉर क्रिमिनल) मानेल असे धोरण आहे. इंग्रजांकडे युद्धकैदी सोपवले की, ते त्यांना मृत्यूदंड द्यायला मोकळे ! इंग्रजांविरुद्ध लढणार्‍यांना आपण युद्धकैदी मानून त्यांच्याकडे सोपवण्याचे कारणच काय ?

२. दोन्ही देश (इंग्लंड आणि भारत) भाषा, इतिहास आणि संस्कृती या क्षेत्रांत संयुक्त काम करतील, असाही करारात उल्लेख आहे. करार करतांना भाषा अशी फसवी वापरली गेली आहे. या सूत्राचा दुसरा अर्थ असा होतो की, भारत म्हणतो, आम्ही भारतात अशा प्रकारे शिकवू आणि वागू की, कुणी इंग्रजांच्या विरुद्ध काही करणार नाही !

३. या कराराच्या अंतर्गत भारताने प्रशासकीय व्यवस्था आणि न्यायदान व्यवस्थाही इंग्रजांनी जशी ठेवली होती, तशीच ठेवण्याचे मान्य केले आहे.

स्वतंत्र भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर खरे तर इंग्रजांची धोरणे पुढे न चालवता भारताने स्वतंत्र व्यवस्था चालवायला हवी होती; पण दुदैवाने तसे झाले नाही. आपण भाषा, चालीरिती, व्यवस्था सर्व इंग्रजांप्रमाणेच चालू ठेवले.

इंग्रजांचे हित भारतात सुरक्षित राहील, यासाठी इंग्रजांना भारतात जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी मैत्रीचा दाखला देत गांधींवर दबाव टाकला. गांधीजी त्यासाठी सिद्ध झाले. सत्ता हस्तांतरणाच्या वेळी जवाहरलाल नेहरूंनी इंग्रजांची प्रशंसा केली होती. इंग्रजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.

मेकॉले शिक्षणपद्धतीवर टीका करणार्‍यांनी ती बदलली का नाही ?

देशात अनेक वेळा मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीवर टीका केली जाते; पण प्रश्‍न असा आहे की, वर्ष १९४७ नंतर भारताने ती शिक्षणपद्धती पालटली का नाही ? मेकॉलेसह भारताचा शिक्षणपद्धतीविषयी काही करार झाला होता का ? मेकॉले हा इंग्लंडमधील एक साधा कारकून होता. त्याने काढलेल्या आदेशाला एवढे महत्त्व का प्राप्त होते ? भारतात तर प्रतिदिन कारकूनांकडून किती तरी आदेश काढले जातात ! मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धती न पालटण्यामागे काँग्रेस आणि भाजप, आतापर्यंतचे शिक्षणसचिव दोषी आहेत.

भारताने ५ सहस्रावा सैन्य स्थापना दिवस साजरा करावा !

भारत सैन्य स्थापना दिवसही इंग्रजांकडून १५ जानेवारीला हस्तांतरित झाला.
१५ जानेवारीला भारतीय सैन्यदल प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एम्. करिअप्पा यांनी इंग्रजांचे शेवटचे सैन्यदल प्रमुख जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. वास्तविक भारतीय सैन्याला शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. महाभारत युद्धात सैन्याविषयी आपण वाचलेले आहे ! मग महाभारतकाळ धरला, तर भारत भारतियत्वाची ओळख म्हणून ५ सहस्रावा सैन्य स्थापना दिवस का साजरा करत नाही ?

आंतरराष्ट्रीय न्यायालयात इंग्रजांविरुद्ध हानीभरपाईचा दावा ठोकायला हवा !

इंग्रजांच्या झुंडी व्यापाराच्या निमित्ताने भारतात आल्या. त्यांनी छळ-कपट करून भारताच्या काही भागांवर अवैधरित्या नियंत्रण मिळवले. भारताला आता स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली आहेत ! इंग्रज चोर आमच्या देशात अवैधरित्या घुसले, त्यांनी अमुक इतक्या रकमेच्या मालमत्तेची हानी केली. त्याची रक्कम चक्रवाढ व्याजाने भारताला  परत मिळावी; म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात हानीभरपाईचा दावा ठोकायला हवा. रक्कम मिळेल कि नाही, ते माहीत नाही; पण दावा ठोकायला काय हरकत आहे ?


Multi Language |Offline reading | PDF