ठाणे येथे जनावरांच्या औषधांची रुग्णांना विक्री केल्याप्रकरणी औषध विक्रेत्यावर गुन्हा प्रविष्ट

  • ठाण्यातील विविध औषध वितरकांकडून ३ सहस्र औषधे कह्यात

  • गर्भवतीलाही दिले जनावरांचे औषध

वैद्यकीय रुग्णांच्या जिवाशी खेळणारे औषध विक्रेते आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांना कठोर शासनच व्हायला हवे !

ठाणे – शहरातील ‘लाइफकेअर मेडिको’ या दुकानातून औषधांची नावे पालटून जनावरांची औषधे आणि इंजेक्शन रुग्णांना विकली जात होती. याविषयी दुकानदाराला नोटीस बजावण्यात आली असून दुकानाची अनुज्ञप्ती रहित करण्यात येणार आहे. दुकानदार आणि ‘फार्मासिस्ट’ यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ठाण्यातील विविध औषध वितरकांकडून अशा प्रकारची ३ सहस्र औषधे कह्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त (औषध) गिरीश हुकरे यांनी दिली. एका गर्भवती महिलेलाही ‘ऑक्सिटोसिन’ हे औषध दिल्याचे उघड झाले.

१. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पडताळणीत दुकानातील ८२ औषधांवर चुकीचे ‘लेबल’ लावल्याचे आढळून आले. ‘औषधांच्या लेबलवर ‘जनावरांच्या वापरासाठी हे औषध असून ते रुग्णांसाठी वापरता येणार नाही’, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे’, असे हुकरे यांनी सांगितले.

२. अशा प्रकारची औषधे आणखी किती रुग्णालयांतून रुग्णांना देण्यात आली आहेत, याची चौकशी केली जाईल.

३. याविषयी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

‘औषधांवरील चुकीच्या लेबलविषयी आम्हाला कल्पना नव्हती’, असा दावा ‘लाइफकेअर मेडिको’चे भागीदार रवींद्र शिरोळे आणि फार्मासिस्ट ललिता झिंझाड यांनी केला आहे. ‘या प्रकरणी चौकशी चालू आहे. संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत’, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF