अंदमानातील ‘गाईड’कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सांगितली जाते केवळ १-२ ओळींची माहिती !

प्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांचा अनुभव

  • अशा ऐतिहासिक ठिकाणी ‘गाईड’ काय माहिती सांगतो, हे सरकारला ठाऊक नसते का ? सरकारकडून केवळ पाठ्यपुस्तकातील दिशाभूल करणारा इतिहास पालटणे अपेक्षित नाही, तर लोकांना ऐतिहासिक ठिकाणी सत्य इतिहास सांगण्याची व्यवस्था करणेही अपेक्षित आहे !
  • लोकहो, आतापर्यंतचे शासनकर्ते क्रांतीकारकांना जरी सोयीस्करपणे विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
  • देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या क्रांतीकारकांची उपेक्षा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

प्रस्तुत लेखातून प्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी अंदमानच्या ‘सेल्यूलर जेल’मधील त्यांचे अनुभव आणि तेथे क्रांतीकारकांसंदर्भात योग्य माहिती पुरवण्याची व्यवस्था नसणे, या विषयांवर प्रकाश टाकला आहे. लेखातून लेखकाची कळकळ स्पष्ट दिसून येते; परंतु अंदमानची ‘सेल्युलर जेल’ असो कि अन्य भारतातील ऐतिहासिक स्थळे, त्यांचे योग्य जतन नि संवर्धन करण्यात आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी अपेक्षित लक्ष घातलेलेच नाही. हिंदु राष्ट्रात मात्र हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने जतन, संवर्धन अन् प्रसार केला जाईल, हे लक्षात घ्या !

‘मी गेली ७ वर्षे सातत्याने अंदमानला जात आहे. कालही गेलो होतो. तेथे ‘सेल्युलर जेल’मध्ये जात असतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्याख्यान घेतो.

तेथे अनेक राज्यांतून लोक येतात. त्यांच्यासमवेत ‘गाईड’ असतो. काल मीही ‘सेल्युलर जेल’मध्ये होतो. तेव्हा गाईड काय सांगतो, ते मुद्दामहून ऐकले.

गाईड : देखे, यहां गोरे लोगों ने कैदियों को रखा था । यहां उनको अलग अलग सजा दी जाती थी । अब देखो और एक घंटे में वापस आना है ।

पर्यटक : लेकिन वो सावरकर कहां रहते थे ?

गाईड : हां, वो सावरकर को दूसरे मालेे पे रखा था । अब समय कम है, जल्दी वापस आओ ।

बास, एवढीच माहिती ! कैदी म्हणजे काय ? ते चोर दरोडेखोर असे कोणी गुन्हेगार होते का ? तर नाही. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून आयुष्याचा त्याग करून स्वत:ला देशासाठी समर्पित केलेले देशभक्त, क्रांतीकारक होते.

मी माझ्या समवेतच्या लोकांना कोठडीत तासभर बसवले. त्यांना कल्पना करायला सांगितली की, एका घंट्यात एवढा त्रास झाला. २४ घंट्यांचा एक दिवस ! ३० दिवसांचा एक मास ! १२ मासांचे एक वर्ष ! अशी ११ वर्षे सावरकर त्या ७ फूट बाय ११ फुटांच्या कोठडीत संपूर्ण बेड्या घातलेल्या अवस्थेत कसे राहिले असतील ? तेथील यातना ! कोलु, काथ्या कुटणे, हातातून रक्त यायचे ! अन्नामध्ये किडे सापडायचे. कोठडीत पाली, सरडे, किडे यायचे. अशी ११ वर्षे ! बॅरिस्टर झालेला माणूस केवळ देशासाठी कसा राहिला असेल ?

मग सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वहायला लागले. बाकीचे पर्यटक केवळ ‘ब्रिटीश काळातील कैद्यांची कोठडी’ एवढ्यावरच थांबले. त्यातील धग, यातना, वेदना त्यांना कळल्याच नाहीत. कसे सावरकर आणि समकालीन क्रांतीकारक कळणार ? मी तरी कोणाकोणाला सांगणार ? शक्य नव्हते.

मन विषण्ण झाले. परतीच्या प्रवासात सगळे विचार चालू झाले की, का सरकारच्या वतीने चांगली माहिती देणारे तेथे ठेवले जात नाहीत ? का क्रांतीकारकांविषयी इतकी अनास्था ? का का का ?

पुढच्या पिढ्यांना कसे कळणार की, गांधी-नेहरू व्यतिरिक्त सहस्रो देशभक्त होऊन गेले. स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. शालेय पुस्तकांतून तर सगळाच शौर्याचा इतिहास वगळून टाकला आहे. कसे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भगतसिंह, सावरकर जन्माला येणार ? कसे होणार भारताचे ? चिंता लागून रहाते. मग असे काहीतरी लिहून मनातले विचार तुमच्या समवेत वाटतो.’

– श्री. शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ

(संदर्भ : श्री. शरद पोंक्षे यांच्या फेसबूकवरून साभार)

 

 

श्री. शरद पोंक्षे