सनातनद्वेषी श्याम मानव म्हणतात,‘‘शरद पवार यांच्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाची तत्कालीन सरकारकडे शिफारस !’’

सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अधिकाराचा कसा दुरुपयोग केला गेला, हेच यातून दिसून येते ! ईश्‍वरी पाठबळामुळे सनातनवर बंदी आली नाही; मात्र ती आणू पहाणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला, हे या पक्षाने लक्षात घ्यावे !

चंद्रपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष दिले म्हणून आतंकवादविरोधी पथकाने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी तत्कालीन सरकारकडे शिफारस केली होती, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिली. चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. (यावरून भारतातील अन्वेषण यंत्रणा राजकारण्यांच्या ताटाखालील मांजरे आहेत, हेच दिसून येते. अशांचे अन्वेषण पारदर्शक काय असणार ? – संपादक)

या वेळी श्याम मानव म्हणाले,

१. २००८ मध्ये शरद पवार यांना मी पत्र लिहिले होते. ज्यामध्ये सनातन आणि हिंदु जनजागरण समिती हे लोक विरोधकांना विष देऊन मारतील, एड्सचे इंजेक्शन देऊन मारतील, बंदुकीने मारतील अशी पूर्ण सूची दिली होती. (‘समानशीले व्यसनेषु सख्यम् ।’ या म्हणीनुसार सनातनद्वेष्टे एकमेकांशी कशी हातमिळवणी करतात, हे यातून दिसून येते.  सनातन संस्थेची अपकीर्ती करणारे पत्र लिहिणारे श्याम मानव यांच्यावर कारवाई करण्यासाठी संस्था अधिवक्त्यांचे समादेशन घेत आहे. – संपादक)

२. याआधी हीच माहिती तत्कालीन गृहमंत्री आर्.आर्. पाटील यांनाही दिली होती; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शरद पवार यांनी लक्ष दिल्यावर आतंकवादविरोधी पथकाने धारिका सिद्ध केली आणि बंदीची मागणी केली. तेव्हापासून आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी सनातन-हिंदु जनजागरणच्या सदस्यांकडे चहा पीत नाहीत.

३. मूळ पत्र पवार यांच्या नावाने असल्यामुळे ते उघड करत नाही; कारण शरद पवार यांच्यासारख्या माणसाने पुढे केले काय, असा प्रश्‍न निर्माण होईल.

४. आघाडी सरकारच्या काळात संमत झालेला ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायदा आणि कार्यवाही’ यांचे जनजागृती कार्य त्याच काळात वेगाने झाले; मात्र देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून यातील एकही पैसा मिळाला नाही. जनजागृती आणि पोलीस प्रशिक्षण यांचे काम ठप्प झाले आहे.

५. आधीच्या सरकारमध्ये भेटीगाठीच्या दरम्यान अजित पवार या कायद्यासाठी सरकारी सचिवांना दूरध्वनी करायचे, तेव्हा यंत्रणा लगबग करायची; मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या सचिवांना फोन केला, तरी सचिव भेटीची वेळ देत नाही. (यावरून शासनदरबारी आता श्याम मानव यांचा आदरसत्कार होत नसल्यामुळे त्यांचा तीळपापड होत आहे, हे निश्‍चित ! – संपादक)

(संदर्भ : एबीपी माझा)