गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी अभिनेते प्रकाश रै यांची चौकशी करा ! – श्री. चक्रवर्ती सूलिबेले, संस्थापक, कर्नाटक राज्य युवा ब्रिगेड

मंगळुरू (कर्नाटक) – उजव्या विचारसरणीच्या लोकांनीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे अभिनेते प्रकाश रै सांगत आहेत. याविषयी त्यांना इतकी खात्रीशीर माहिती असेल, तर पोलिसांनी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ‘कर्नाटक राज्य युवा ब्रिगेड’चे संस्थापक तथा प्रख्यात वक्ते श्री. चक्रवर्ती सूलिबेले यांनी केली. ‘गौरी लंकेश यांची हत्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केली’, हा आरोप आता थांबवला पाहिजे. यासाठी सरकारने खर्‍या मारेकर्‍याला लवकरात लवकर शोधले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ नोंव्हेंबर येथे ‘डाव्या विचारसरणीच्या लोकांची हत्या : हिंदूंवर आरोप का ?’ या विषयावर ‘जनसंवाद सभे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये श्री. सूलिबेले बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मूडबिद्रे येथील श्रीक्षेत्र करिंजे क्षेत्राचे श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच अधिवक्ता सुब्रह्मण्य अगर्त उपस्थित होते.

श्री. सूलिबेले पुढे म्हणाले, ‘‘सर्वसाधारणपणे पुराव्यांच्या आधारे आरोपींना शोधले जाते. या प्रकरणात मात्र अगोदर आरोपी कोण, हे ठरवून पुरावे गोळा केले जात आहेत. हे हास्यास्पद आहे. प्रत्यक्षात सरकारकडे ३ रेखाचित्रे सोडून कोणताही पुरावा असा नाही. दाभोलकर आणि पानसरे यांच्या वैयक्तिक प्रकरणांविषयी माहिती आता उजेडात येत आहे. त्याविषयीचे सत्य यथावकाश बाहेर येईलच.’’