प्रतिदिन केवळ ५० सहस्र भाविकांनाच वैष्णोदेवीच्या दर्शनाची अनुमती ! – राष्ट्रीय हरित लवाद

मक्केला लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतात; मात्र तेथे असे निर्बंध घालावे लागत नाहीत !

(सौजन्य : आयबीटाईम्स)

नवी देहली – जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या प्रतिदिन वाढत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने प्रतिदिन केवळ ५० सहस्र भाविकांनाच दर्शन घेण्याची अनुमती देणारा आदेश दिला आहे. तसेच वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात कोणतेही बांधकाम न करण्याची सूचनाही केली आहे. या परिसरात अनेकदा भूस्खलन झाल्याने हरित लवादाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वैष्णोदेवी परिसरात कोणत्याही परिस्थितीत ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्या, असे प्रशासनाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे; मात्र हे आदेश केव्हापर्यंत लागू असणार आहेत, याविषयी लवादाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

१. लवादाने त्याच्या आदेशात पुढे म्हटले आहे की, ५० सहस्रांपेक्षा अधिक भाविक आल्यास त्यांना अर्द्धकुंवारी किंवा कटरा येथेच थांबवण्यात यावे. वैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता ५० सहस्र इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक भाविकांना दरबारात जाण्याची अनुमती दिल्यास ते धोकादायक ठरू शकते; म्हणूनच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

२. वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापन समितीने २४ नोव्हेंबरपर्यंत भाविकांसाठी नवा रस्ता खुला करावा. नवा रस्ता केवळ बॅटरीवर चालणार्‍या गाड्या आणि भाविकांसाठी असेल, असेही लवादाकडून स्पष्ट करण्यात आले.

३. वर्ष १९८६ मध्ये येथे सुमारे १४ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. वर्ष २०१२ मध्ये ही संख्या १ कोटी ४ लाख इतकी झाली.

४. वर्ष २०१६ मध्ये उन्हाळ्याच्या कालावधीत उदा. एप्रिलमध्ये ८ लाख, मेमध्ये ९ लाख आणि जूनमध्ये १२ लाख लोकांनी यात्रा केली होती. हिवाळ्यात ही संख्या न्यून होते.