चीनच्या सैनिकी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपिन्समध्ये अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये चर्चा

मनिला (फिलिपिन्स) – प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथे चीनच्या सैनिकी हालचाली वाढत आहेत. यामुळे येथे एकत्र आलेल्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. यातून सामाईक हितसंबंध जपण्यासाठी सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले. ‘आसियान’ या पूर्व आशियायी देशांच्या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख मनिलामध्ये आले आहेत. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल उपस्थित आहे. या पार्श्‍वभूमीवर अधिकार्‍यांनी चर्चा केली.

या चर्चेविषयी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, हिंदी आणि प्रशांत महासागरातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यांचा विचार करून सहकार्य करण्यावर या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्व देशांचे दीर्घकालीन हितसंबंध जपण्यासाठी हा परिसर मुक्त आणि खुला असण्यावर सर्व देशांचे एकमत झाले; तसेच आतंकवाद, शस्त्रास्त्रांची तस्करी यांमुळे या भागाला धोका आहे, याचाही विचार करण्यात आला.

येथे आयोजित मेजवानीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे पंतप्रधान ली कछियांग यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. या मेजवानीवेळी मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्याबरोबरही काही वेळ हितगुज केले.

दक्षिण चीन समुद्राच्या वादात मध्यस्थी करू ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी व्हिएतनामला अधिकृत भेट दिली. व्हिएतमानचे अध्यक्ष ट्रान दाई क्वांग यांच्याबरोबरील चर्चेमध्ये त्यांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याची सिद्धता दाखवली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now