जनभावना कि महत्त्वाकांक्षा ?

संपादकीय

क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी साजरी केलीच. हट्टाला पेटलेल्या काँग्रेसी सरकारने ठरवल्याप्रमाणे हे केलेच. बहुसंख्यांकांचा विरोध असतांनाही हे करून दाखवले. कर्नाटक शासनाला विजयाचे समाधान मिळाले असेल; पण विरोधकांचा हा पराजय आहे का ? ११ सहस्त्र पोलिसांची तैनात ठेवून आणि १ सहस्त्र विरोधकांना कह्यात घेऊन जयंती साजरी झाली. म्हणजे एका हिंदुत्वनिष्ठाला कह्यात घेण्यासाठी ११ पोलिसांची नियुक्ती हे समीकरण विचारात घेता हिंदुत्वनिष्ठांचा हा विजय आहे. हिंदुत्वनिष्ठांची कणखरता दिवसेंदिवस कशी वाढत आहे, हे लक्षात येते. कर्नाटक राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी होणारे हे तिसरे वर्ष आहे. टिपूची जुलमी कारकीर्द राज्यातील लोकांना इतिहासातून माहीत झालेली आहे. हिंदूंवर त्याने केलेले अत्याचार आणि हिंदूंची झालेली अपरिमित हानी हिंदू विसरलेले नाहीत. हिंदु संस्कृतीच नष्ट करण्याच्या उद्देशाने पेटून उठलेला हा तत्कालीन राजा वृत्तीने क्रूर होता. त्यामुळे त्याची जयंती साजरी करून त्याचे असे कोणतेच आदर्श जनतेसमोर ठेवण्यासारखे नाहीत. जनतेसमोर जातील ती त्याची क्रूर अशी कृत्ये. सद्यस्थितीत ते उपयुक्त आहे का ? देशात आणि जगभर आतंकवाद्यांनी हिंसाचाराची परिसीमा गाठली आहे. माणसाच्या जन्माचा उद्देश सफल होईनासा झाला आहे. जगभरातील लोकांना अकाली मरणाला सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक सरकारला ही गोष्ट माहीत नाही, असे कसे म्हणता येईल ? एका राज्याचा कारभार चालवण्याचे दायित्व असणारे सरकार राज्यातील जनतेच्या भावनांकडे कसे दुर्लक्ष करू शकते ? न्यायालयानेही कर्नाटक राज्य सरकारला टिपू सुलतानची जयंती साजरी करून काय मिळवायचे आहे ?, असा प्रश्‍न विचारला होता. टिपू सुलतान स्वातंत्र्यसैनिक होता, असे उत्तर राज्य सरकारने दिले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. टिपू सुलतान म्हैसूर प्रांताचा राजा होता. तो देहलीच्या तख्तावर बसून देशाचा कारभार सांभाळणारा राजा नव्हता. राजा स्वतःचे राज्य सांभाळण्यासाठी इतर राजांशी प्रसंगी लढाई करत असे. तो इंग्रजांशी लढला असेल, तर स्वतःचे म्हैसूर राज्य सांभाळण्यासाठी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो इंग्रजांशी लढला नाही. कर्नाटक राज्याच्या सरकारला हा इतिहास माहीत असूनही त्याने टिपूची जयंती साजरी करण्याचा स्वतःचा अट्टाहास पूर्ण केला. टिपू एक योद्धा स्वातंत्र्यसैनिक होता, असा समज करून घेऊन या सरकारने राज्यातील आणि शेजारी राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांची नाराजी ओढवून घेतली आहे. एक साधा प्रश्‍न या सरकारला विचारता येतो की, टिपू सुलतान स्वातंत्र्यसैनिक होता, तर राष्ट्रीय पातळीवर त्याचा सन्मान का नाही आणि देशातील इतर राज्ये त्याचा उदोउदो का करत नाहीत ? या प्रश्‍नाचे उत्तर कर्नाटकातील काँग्रेस सरकार देऊ शकत नाही. मागील तीन वर्षांपासून या सरकारला टिपूची जयंती साजरी करण्याचा पुळका आला, यामागेही काहीतरी बरा-वाईट हेतू असावा, असे म्हणता येते.

पाप हीच संज्ञा !

राज्यस्तरीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यात पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो, याचा अर्थ राज्यातील सगळी जनता राज्याच्या निर्णयाशी सहमत नाही. राज्याची सगळी जनता कार्यक्रमात सहभाग घेत नसेल, तर त्यात राज्यशासनाला कसले उत्सवी समाधान मिळणार ? कार्यक्रम किंवा उत्सव म्हणजे आनंद-समाधान मिळवण्याचे क्षण ! राज्यातील बहुसंख्य जनतेच्या चेहर्‍यावर हिरमोडाच्या छटा, तर काही मर्यादित जनतेचे चेहरे समाधानाचे हास्य दाखवणारे ! राज्यातील जनतेमधील ही संमिश्र भावना कोणत्या राज्यप्रमुखाला समाधान देईल ? कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध असतांनाही राज्य सरकारला त्याचे काही वाटले नव्हते. कार्यक्रम पार पाडण्याविषयी सरकार ठाम होते. म्हणजे सरकारला काहीतरी हेतूच साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याप्रमाणे या उत्सवाची फलनिष्पत्ती कधीतरी सर्वांनाच कळेल. केवळ हे सूत्र न विसरता त्याचा पाठपुरावा करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. राज्यस्तरीय कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण पाठवू नका, असे केंद्रीयमंत्र्याने म्हटल्याचे दुःख राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झाले नाही. कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारणे, ही मोठीच घटना आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवूच नका, असे केंद्रशासनातील एका मंत्र्याने म्हणणे, हा मतभेदाचा उच्चांकच म्हणावा लागेल. तरीही राज्यशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. म्हणजे केंद्रशासनाशी असलेले मतभेद उघड झाले. तिकडे बंगालचे सरकारही केंद्रशासनाला जुमानत नसल्याचे प्रसंग घडत असतात. म्हणजे कर्नाटक आणि बंगाल अशी दोन राज्ये लोकराज्य व्यवस्थेच्या गुणधर्मांचा पुरा लाभ उठवत आहेत, असेच म्हणावे लागते. अर्थात् हे करतांना कुठे उद्धटपणा दिसत नाही ना ? आपल्या राजकीय व्यवस्थेला हे पोषक आहे का ? बहुसंख्य जनता कुठे दुखावली जाते का ? देशाचे हित कसे जोपासले जाईल ? राजकारण हे समष्टी कार्य आहे. त्याला आपण योग्य योगदान देतो का ? शंभर अपराधी सुटले, तरी चालेल; पण एका निरपराध्याला शिक्षा व्हायला नको, हे सूत्र आपण आत्मसात केले आहे का ? आपली विचारप्रक्रिया तेवढी स्वच्छ आहे का ? या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. राजकीय पक्षांचे एकमेकांशी तात्त्विक मतभेद असतात. तरीही राज्यातील किंवा देशातील जनतेचे कल्याण, हेच सर्व राजकीय पक्षांसाठी मूलभूत सूत्र असते. जनतेला कोणत्याही मानसिक दडपणाखाली नेऊन राज्यकारभार करणे हे राजकीय पाप आहे. कर्नाटक राज्यातील बहुसंख्य जनतेच्या भावना विचारात न घेता राज्य सरकारने टिपूची जयंती साजरी केली, याला पापाशिवाय दुसरी संज्ञा नाही !