|

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – महाराष्ट्र शासनाने मासेमार नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मासेमारीसाठी वापरलेल्या डिझेलवरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. १९ जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० मत्स्य सहकारी संस्थांच्या नौकामालकांना २ कोटी ३६ लाख १७ सहस्र ५५० रुपये एवढी रक्कम संमत करण्यात आली आहे. २३ जूनपासून ही रक्कम जिल्ह्यातील एकूण ३०० नौकामालकांच्या खात्यांवर ‘ऑनलाईन’ पद्धतीने जमा करण्यात येत आहे.
मे २०२५ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमार नौकाधारक यांचा ४ कोटी ३६ लाख ५ सहस्र ८१५ रुपये एवढा डिझेल परतावा प्रलंबित होता. प्रलंबित रक्कम लवकरात लवकर संमत करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळवले आहे. पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत हे अनुदान रक्कम संमत केल्याने मासेमार नौकाधारकांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.