स्वराज्य शिवप्रेमी संघटनेचा पुढाकार

मालवण (सिंधुदुर्ग) : येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यास येणार्या पर्यटकांकडून पावित्र्य राखले जावे, या अनुषंगाने ‘स्वराज्य शिवप्रेमी संघटने’च्या वतीने राजकोट किल्ला येथे लावण्यात येणार्या माहितीफलकाचे अनावरण सौ. शिल्पा खोत आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘हे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात येणार आहेत’, असे सौ. खोत यांनी सांगितले.

‘राजकोट येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून, तसेच देशभरातून अनेक पर्यटक येतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असल्याने त्यांचे दर्शन घेतांना योग्य कपडे परिधान करणे आवश्यक आहे; मात्र पर्यटकांकडून याचे उल्लंघन होत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. याच किल्ल्यात ब्राह्मण देवालय असल्याने त्याचेही पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याच दृष्टीने स्वराज्य शिवप्रेमी संघटनेच्या वतीने माहितीदर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले’, असे या वेळी सौ. शिल्पा खोत यांनी सांगितले. या वेळी ‘स्वराज्य ढोल-ताशा पथका’चे सदस्य आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.