
फोंडा, २४ जून (वार्ता.) कुणाला मंत्रीमंडळात ठेवावे आणि कुणाला ठेवू नये, हा भाजपचा अंतर्गत निर्णय आहे अन् यामुळे भाजपच्या आमदारांविषयी मी काहीच बोलू शकत नाही, तरीही प्रत्येक आमदाराने सरपंच, पंच आणि लोक यांच्याशी आदराने वागले पाहिजे. जे चांगले वागत नाहीत, त्यांना कर्माची फळे भोगावीच लागतात, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी २४ जून या दिवशी कवळे येथे व्यक्त केली. गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून वगळल्यानंतर, तसेच गोविंद गावडे यांच्या खांडोळा येथील सभेनंतर प्रथमच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यांचे मते मांडले आहे.
प्रियोळसह सर्वच मतदारसंघांमध्ये मगोचे काम चालूच रहाणार
मंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘मगो पक्षाचे काम योग्य पद्धतीने चालू आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये पक्ष वाढवण्यावर आमचा भर आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. प्रियोळसह सर्व मतदारसंघांमध्ये मगोपचे मतदार आणि समर्थक आहेत. दाबोळी मतदारसंघात मगोला यापूर्वी ५ सहस्र मते मिळाली होती.’’
नियतीने आज त्याला शिक्षा दिलीपत्रकारांनी ‘मनोहर पर्रीकर आजारी असतांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचा प्रस्ताव होता का ? आणि याला गोविंद गावडे यांनी आक्षेप घेतला होता का ?’, असा प्रश्न केला असता उत्तरादाखल मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘मनोहर पर्रीकर आजारी असतांना मला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला होता. मनोहर पर्रीकर यांनी त्याला संमती दिली होती; मात्र विद्यमान मंत्री रोहन खंवटे, आमदार विजय सरदेसाई आदींनी याला तीव्र आक्षेप घेतला. एवढ्यावरच न थांबता संबंधित एका आमदाराने एका बैठकीत मला अपशब्दही वापरले होते. मनोहर पर्रीकर यांना त्या आमदाराचे बोलणे आवडले नव्हते; मात्र नियतीने आज त्याला शिक्षा दिली आहे. उशिरा का होईना; परंतु त्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागले. त्यामुळे यापुढे तरी त्या आमदाराकडून चांगले कर्म अपेक्षित आहे. मी मुख्यमंत्री होणार कि नाही, हे सर्वस्वी जनता आणि माझे नशीब यांवर अवलंबून आहे.’’ |