गोव्याला पावसाचा तडाखा : ठिकठिकाणी पडझडीच्या घटना

पावसाने ३४ दिवसांत गाठले इंचांचे अर्धशतक

पणजी, २४ जून (वार्ता.) – भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने २८ जूनपर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता (यॅलो अलर्ट) वर्तवली होती; मात्र २४ जून या दिवशी वेधशाळेचा अंदाज खोटा ठरवतांना पावसाने गोव्याला झोडपून काढले. राज्यात वादळी वार्‍यासह दिवसभर जोरदार पाऊस पडला. मागील २४ घंट्यांमध्ये दीड इंच, तर सकाळपासून १ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शाळेच्या वेळेत पाऊस पडल्याने विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली. राज्यात २० मे ते २३ जून या ३४ दिवसांच्या कालावधीत सरासरी ५० इंच पावसाची नोंद झाली आहे.

अनेक ठिकाणी झाडे पडून हानी

नेरूल येथील श्री सतीदेवी मंदिरावर झाड कोसळल्याने घुमटीची हानी झाली आहे. पणजी येथे रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर फोंडा येथे घरावर झाड कोसळल्याने मोठी हानी झाली. होंडा, सत्तरी येथे एक आंब्याचे झाड कोसळल्याने १ घर आणि चारचाकी वाहन यांना काही अंशी हानी पोचली. २३ जूनला आगशी येथे मोठे झाड कोसळून २ घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या प्रकरणी एकूण अंदाजे १४ लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ओशेल, शिवोली येथे झाड कोसळल्याने भाजपचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या घराच्या संरक्षक भिंतीची हानी झाली.

कळंगुट येथे ‘होर्डिंग’ कोसळला : वाहतूक हडफडेमार्गे वळवली

कळंगुट येथे पल्मारीन हॉटेलजवळ कळंगुट–म्हापसा रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास जोरदार वार्‍यामुळे एक मोठा ‘होर्डिंग’ (फलक) रस्त्यावर कोसळला; मात्र ही दुर्घटना पहाटे घडल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करून ती हडफडेमार्गे वळवण्यात आली.

दिवाडी-जुने गोवे फेरीसेवा बंद, ‘रॅम्प’ पाण्याखाली

(रॅम्प म्हणजे फेरीबोटीत जाण्यासाठीची उतरती वाट)

जोरदार पाऊस आणि भरती यांमुळे दिवाडी–जुने गोवे फेरी मार्गावरील फेरीबोटीचा रॅम्प पाण्याखाली गेला आहे आणि त्यामुळे तेथील फेरीसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अशा प्रकारची परिस्थिती येथे पावसाळ्यात नेहमी उद्भवत असते.

अनमोड-हेमंडगा मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली

गोवा आणि बेळगाव यांना जोडणार्‍या अनमोड-हेमंडगा बगलमार्गावर मेढा गावाजवळ नदीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेली संरक्षक भिंत २४ जून या दिवशी कोसळली. संरक्षक भिंतीजवळील रस्ताही खचल्याने खानापूरला जाणार्‍या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.