|
बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा केवळ टोळीप्रमुख होता, तर वाल्मीक कराड हाच त्यांचा पडद्यामागे असणारा खरा मुख्य सूत्रधार होता, असा दावा विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी २४ जून या दिवशी येथील न्यायालयात युक्तीवाद करतांना केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची येथील जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात जवळपास ३ घंटे सुनावणी झाली. त्यात वाल्मीक कराड याच्या अधिवक्त्यांनी २ घंटे युक्तीवाद केला, तर अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी १ घंटा युक्तीवाद केला.
पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता उज्ज्वल निकम म्हणाले की,

वाल्मीक कराड याने न्यायालयात ‘देशमुख यांच्या हत्येच्या कटात आपला कोणताही सहभाग नाही’, असा दावा केला आहे, तसेच ‘आपल्यावर करण्यात आलेली ‘मकोका’ची कारवाईही चुकीची आहे’, असेही त्याने म्हटले आहे; पण आम्ही त्यावर जोरदार आक्षेप घेतला. आम्ही न्यायालयापुढे त्याच्या विरोधात असणारे पुरावे सादर केले. कटाचा मुख्य सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो. तो आपल्या कठपुतळ्यांच्या माध्यमातून वाईट कृत्य करतो, हे न्यायालयाला पटवून दिले. त्यानंतर न्यायालयाने ७ जुलैपर्यंत आपला निकाल राखून ठेवला आहे.