हे पुस्तक म्हणजे व्यथा नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशा ! – अधिवक्ता भरत देशमुख, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र-गोवा वकील संघ

डावीकडून श्री. अभय वर्तक, अधिवक्ता भरत देशमुख, श्री. विक्रम भावे, अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव – ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकातून श्री. विक्रम भावे यांनी त्यांचे जे अनुभव मांडले आहेत, ते त्यांची व्यथा लोकांसमोर मांडावी, या हेतूने मांडलेले नसून आज हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ युवकांना दिशा मिळावी, हा त्यामागील हेतू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र-गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ अधिवक्ता भरत देशमुख यांनी केले. जळगाव येथील गंधे सभागृहात आयोजित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अधिवक्ता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता शैलेश नागला यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ ४०० हून अधिक धर्मप्रेमी नागरिकांनी घेतला.

माझा मानसिक छळ झाला; पण मी डगमगलो नाही ! – विक्रम भावे

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’ने माझ्यावर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर खोटे आरोप लावून आमचा मानसिक छळ केला; पण मी डगमगलो नाही. ज्या खोट्या पुराव्यांच्या आधारावर आरोपपत्र सिद्ध झाले, ते पहाता हा खटला केवळ मृत व्यक्तीचे ‘मोठे नाव’ असल्यामुळेच उभा राहिला. पोलिसांना कुणालाही पकडून शिक्षा द्यावी लागते, हीच यंत्रणांची मानसिकता झाली आहे.

खोटी माहिती देणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

ज्या अधिकार्‍यांनी विक्रम भावे यांच्या विरोधात हे षड्यंत्र रचले, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. सीबीआयचे अधिकारी ६ वर्षे वारंवार ‘सी.डी.आर्.’ अहवाल आमच्याकडे आहे’, असे सांगत होते; पण विक्रम भावे यांच्या अधिव्यक्त्यांनी न्यायालयात तो अहवाल दाखवण्यास सांगितला, तेव्हा त्यांना तो अहवाल सादर करता आला नाही.

कायद्याच्या अभ्यासकांनी अभ्यासावे असे हे पुस्तक आहे ! – अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले 

विक्रम भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकात दाभोलकर हत्या खटल्याविषयी जे संदर्भ दिलेले आहेत, ते अतिशय चिंतनीय असून कायद्याच्या अभ्यासकांनी अवश्य या पुस्तकाचा अभ्यास करावा. यातून बरेच शिकण्यासारखे आहे.

श्री. प्रशांत जुवेकर यांनी गोवा येथे वर्ष २००९ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्यात कसे गोवले गेले, त्यांना ४ वर्षे कारावासात कसा त्रास सहन करावा लागला, याविषयी त्यांचे अनुभवकथन केले.