|

अहिल्यानगर – धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची कन्या ऋतुजा आहे. तिने धर्मासाठी बलीदान दिले. हिंदु धर्म कुणावर अन्याय करणारा नाही; पण हिंदूंना कुणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेत दिली. सांगलीतील ऋतुजा राजगे या ७ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर येथे २२ जून या दिवशी हिंदु जनआक्रोश मोर्चा काढून जाहीर सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेस महिलांसहित ७०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, हिंदु धर्म सोडून इतर धर्मात गेलेले बाटगे अधिक कडवट असतात. त्या प्रत्येकाची माहिती काढा, ते पूर्वी कुठल्या धर्मात होते. आता कुठल्या माध्यमातून इतर धर्माचा प्रसार करतात, याचा केवळ एक पुरावा शोधा. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नियमानुसार जे हिंदु धर्म सोडून इतर धर्मात जाऊन शासकीय सवलती घेतात, त्यांच्या सवलती बंद करा.
हिंदूंना नियम आणि इतरांना सवलती, हे कदापि सहन करणार नाही ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

कितीही संकटे आली, कितीही आमिषे दाखवली, तरी धर्म बदलता कामा नये, याचे ताजे उदाहरण म्हणजे ऋतुजा आहे. ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, तिला गर्वाने सांगता आले पाहिजे की, माझा मुलगा / मुलगी धर्मासाठी लढले. सध्या आपल्या मुली, महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा आणि धर्मांतरबंदी कायदा लवकर लागू करण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत, त्याचसमवेत हिंदूंना नियम अन् इतरांना सवलती, हेही यापुढे कदापि सहन केले जाणार नाही.
धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श आज ऋतुजाने घेतला आहे ! – अधिवक्त्या (सौ.) वर्षाताई डहाळे

धर्मांतर म्हणजे स्वतःची आई इतरांना विकण्यासारखे आहे. तुटपुंज्या पैशांसाठी, आपल्या तात्पुरत्या गरजा भागवण्यासाठी काही लोक धर्मांतरित होतात. १ सहस्र २०० वर्षांनंतरही ही परिस्थिती पालटली नाही. धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श आज ऋतुजाने घेतला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.