छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसवल्याविना हिंदु मावळा शांत बसणार नाही ! – सुश्री प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील ‘हिंदु रक्षा कृती समिती’च्या वतीने आयोजित जाहीर सभा ! 

हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले एक दैवत आहे. त्यांचा पुतळा हा नियोजित जागेतच बसवला गेला पाहिजे. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसत नाही, तोपर्यंत प्रत्येक हिंदु मावळा शांत बसणार नाही. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी श्रीरामपूरला ४० वर्षे लढावे लागते, हे या महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे दुर्दैव आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सुश्री प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.

सुश्री प्रतीक्षा कोरगावकर

श्रीरामपूर या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सरला पिठाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमीपूजन केले होते; पण आता ही जागा पालटून श्रीरामपूर येथील भाजी मंडईमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याचे नियोजन चालू आहे. या घटनेला विरोध करण्यासाठी श्रीरामपूर येथील ‘हिंदु रक्षा कृती समिती’च्या वतीने श्रीरामपूर शहरात मशाल मोर्चा आणि जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी सुदाम महाराज चौधरी होते. या वेळी व्यासपिठावर ह.भ.प. सेवालाल महाराज, ऋषिकेश महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय पांडे, हिंदु रक्षा कृती समितीचे निमंत्रक श्री. प्रकाश चित्ते, आचार्य महेशजी व्यास, सुनील खपके आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलतांना सुश्री प्रतीक्षा कोरेगावकर म्हणाल्या की, सध्या आपण पहातो हिंदु महिला आणि मुलींचे गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागचे कारणही सर्वांनी लक्षात घेऊन सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या धर्मावर होणारे आघात आपल्या माता भगिनींची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा देऊ शकतो.

छत्रपतींच्या पुतळ्याची जागा पालटणे, हा हिंदु अस्मितेचा पराभव ! – प्रकाश चित्ते, निमंत्रक, हिंदु रक्षा कृती समिती

प्रकाश चित्ते

नामदार राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये असले, तरी त्यांच्या डोक्यातील निधर्मी विचार गेलेले नाहीत. भविष्यात या ठिकाणी निवडणुकांमध्ये उभे रहाण्याची वेळ आल्यास येथील मुसलमान मतदान करणार नाहीत, हे गृहीत धरून त्यांनी भूमीपूजन केलेली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जागा पालटून भाजी मंडईमध्ये पुतळा बसवण्याचे नियोजन चालू केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे हिंदु अस्मितेचा खर्‍या अर्थाने पराभव झाला आहे. हिंदु समाजाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने लढावे लागेल आणि या नियोजित जागेवरच पुतळा बसवला जाईल.

आचार्य महेशजी व्यास म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा पालटणे हा हिंदु समाज, महंत रामगिरी महाराज आणि सरला पिठाचा अपमान आहे. हे हिंदु समाज सहन करणार नाही.