‘महानिर्मिती’ राज्यात १ सहस्र ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री

मुंबई – राज्यात महानिर्मितीच्या वतीने १ सहस्र ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प हे ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत कार्यान्वित होणार आहेत. त्यांचा राज्यातील ३ लाख शेतकर्‍यांना लाभ होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महानिर्मिती हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंपनी मर्यादित या आस्थापनाचे संपूर्ण मालकीचे उप आस्थापन आहे. १३ सहस्र ८८० मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वांत मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी हे एक आस्थापन आहे. औष्णिक, वायू, जल विद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रांत वैविध्य असलेले महानिर्मिती आस्थापन नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प चालू करत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना अल्पदरात वीजपुरवठा करत कार्बन उत्सर्जनात घट होण्यास साहाय्य होईल. हे सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे.