भाविक वारकरी मंडळाच्या वतीने आमदार अबू आझमी यांचा निषेध !

भाविक वारकरी मंडळाच्या वतीने अबू आझमी यांचा निषेध करतांना पदाधिकारी

सोलापूर – वारी म्हणजे केवळ पायी चालत जाणे नसून मार्गांवर असलेली सर्व गावे, वाडी, वस्ती या ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, संस्कार, विवेक, इत्यादींचे बीजारोपण करणे होय ! त्यामुळे अबू आझमी यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली. भाविक वारकरी मंडळाच्या वतीने पार्क चौक येथे समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली.

या प्रसंगी राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे महाराज म्हणाले, ‘‘वारकर्‍यांकडे असलेला झेंडा हा काठीसहित असतो; त्यामुळे प्रसंगी ती काठी आम्ही उलटी करायला कमी करणार नाही.’’
या प्रसंगी ह.भ.प. जोतिराम चांगभले, ह.भ.प. मोहन शेळके, ह.भ.प. बंडोपंत कुलकर्णी, ह.भ.प. संजय पवार उपस्थित होते.

सातारा येथे आझमी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

अबू आझमी यांचा निषेध करतांना आंदोलक 

सातारा, २४ जून (वार्ता.) – वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा असणार्‍या आषाढी वारीविषयी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद सातारा येथे उमटले असून येथील शिवतीर्थावर अबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात येथील मराठा आणि मुसलमान समाजाचे अनेक आंदोलक सहभागी झाले होते. ‘अबू आझमी यांनी लक्षावधी वारकरी बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे मत या वेळी आंदोलकांनी व्यक्त केले.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे प्रभावी संघटन हिंदुद्रोह्यांवर वचक वसवू शकते !