पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बनावट पासद्वारे दर्शन घेण्याचा प्रकार उघड !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ६ भाविकांनी बनावट पासद्वारे दर्शन घेण्याचा प्रकार उघड झाला. हे भाविक मंदिरात प्रवेशासाठी आल्यानंतर त्यांच्या ‘टोकन पास’चे स्कॅनिंग करण्यात आले. स्कॅनिंगच्या वेळी हे पास बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने कारवाई करत या भाविकांची चौकशी करून त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले. सासवडच्या परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी या भाविकांना १०० रुपये देऊन हे पास दिले होते. जुन्या अधिकृत पासचा वापर करून त्यांच्या आधारे बनावट टोकन सिद्ध करून ते भाविकांना देण्यात आले होते.

आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यात प्रत्यक्ष रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी १० ते १२ घंट्यांचा कालावधी लागतो. संगणकीकृत टोकन प्रणालीमुळे केवळ १ घंट्यात हे दर्शन होते. याचा अपलाभ उठवत काही व्यक्तींनी हे बनावट पास सिद्ध केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १५ जूनपासून ‘टोकन दर्शन’ प्रणालीची कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढील काळात टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

भाविकांनी फसवणूक टाळण्यासाठी मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून नि:शुल्क नोंदणी करावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

संपादकीय भूमिका

वारीमध्ये होणारा धर्मांतरासाठीच्या घुसखोरीचा प्रकार पहाता बनावट पास काढण्यामागे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक ! वारकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यांनी आवश्यक ती पावले तातडीने उचलावीत!