श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति न्यास आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांचे रुग्णसेवा अभियान !

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति न्यास आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने पुण्यात आलेल्या वारकर्यांसाठी २१ जून या दिवशी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित शिबिरात ११ सहस्र ७६४ वारकर्यांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दगडूशेठ गणपति न्यासाचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार आणि सरचिटणीस हेमंत रासने आदींसह पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात २५ रुग्णालयांतील ३७५ आधुनिक वैद्यांसह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. सकाळी १५ सहस्र वारकर्यांना अल्पाहार आणि चहा देण्यात आला, तसेच पालख्यांचे मंदिरासमोर आगमन होतांना पुष्पवृष्टीही करण्यात आली. प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यातील ‘दुगड ग्रुप’च्या वतीने यंदाही ५०० हून अधिक वारकर्यांसाठी पंढरपूरला जाईपर्यंत पुरेल इतकी शिदोरी देण्यात आली, तसेच १० सहस्र ‘शबनम बॅग’चे वाटप करण्यात आले.