
वाशी – समाजातील गरजू आणि आई-वडील नसणार्या विद्यार्थ्यांना श्रीराम राधाकृष्णन् मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर शाळेत हा कार्यक्रम झाला. श्रीविद्यार्थी शिक्षण योजनेच्या अंतर्गत मुलांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवण्यात येतो. या कार्यक्रमात एकूण ६५ विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी ५ सहस्र रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
नवी मुंबई मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला १० सहस्र रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष राधाकृष्णन्, सचिव ललिता मॅडम, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेविका कोमल वास्कर, नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, डॉ. कृष्णमूर्ती विनय राव, मुख्याध्यापक महेंद्र पाटील आणि मंगल भोईर उपस्थित होत्या.