
पुणे – विधी महाविद्यालय रस्त्यावर मैत्रिणीच्या समवेत चारचाकी गाडीमध्ये गप्पा मारत थांबलेल्या व्यक्तीला धमकावून २० सहस्र रुपये घेणार्या डेक्कन पोलीस ठाण्यातील २ कर्मचार्यांना निलंबित करण्याचे आदेश ‘परिमंडळ एक’चे प्रभारी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले. गणेश देसाई आणि योगेश सुतार अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. विधी महाविद्यालय परिसरातील दामले पथ येथे तक्रारदार चारचाकी गाडीमध्ये मैत्रिणी समवेत गप्पा मारत थांबले होते. या वेळी रात्रपाळीवर गस्त घालणार्या दोन पोलिसांनी ‘तुमच्याविषयी तक्रार आली आहे. पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण यायचे नसल्यास २० सहस्र रुपये द्या’, अशी धमकी दिली, तसेच त्यांना कमला नेहरू परिसरातील ए.टी.एम्.मध्ये नेऊन त्यांच्याकडून २० सहस्र रुपये घेतले. या घटनेनंतर मोटारचालक आणि त्यांच्या मैत्रिणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. देसाई आणि सुतार यांच्या वर्तनामुळे पोलीसदलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून या दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिले.
संपादकीय भूमिकासर्वसामान्यांना धाक दाखवून लुटणार्या पोलिसांना कडक शिक्षा होणे आवश्यक ! जनतेचे रक्षक नाही, तर भक्षक बनलेले पोलीस ! |