राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील घटना !
चंद्रपूर – जिल्ह्यातील राजुरा शहरातील रमाबाईनगर येथे १५ जून या दिवशी उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने कविता रायपुरे (वय ५५ वर्षे) या महिलेवर धारदार शस्त्राने आक्रमण करून त्यांचा खून केला. कविता रायपूरे यांच्या घरात छोटे किराणा दुकान आहे. आरोपीकडून अनुमाने १ सहस्र रुपयांची उधारी बाकी होती. त्यामुळे त्यांनी पूर्वीची रक्कम न भरल्यास सिगारेट देण्यास नकार दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला कह्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. मृत महिलेचा मुलगा कामावर गेला असतांना ही घटना घडली. सकाळी त्यांची विवाहित मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. (अल्पवयीन मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन महिलेचा खून करणे, हे मुले किती अधोगतीला गेली आहेत, हेच दर्शवते ! मुलांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी त्यांना शाळेतूनच धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – संपादक)