हिंदी भाषेच्या सक्तीचे प्रकरण

मुंबई – सध्या सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मी माझ्या ‘पॅरानोया’ या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार रकमेसह परत करत आहे, असे लेखक आणि कवी हेमंत दिवटे यांनी सांगितले. ‘सरकारने निर्णय मागे घेतला, तरच मी माझा निर्णय मागे घेईन’, असेही ते म्हणाले. राज्यातील नव्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा शिकणे बंधनकारक केले आहे. त्यात हिंदी भाषेचा पर्याय आहे.
प्रसिद्ध लेखक सचिन गोस्वामी यासंदर्भात म्हणाले, ‘‘आमचा विरोध हिंदी भाषा शिकण्याला नाही, तर मुले थोडी मोठी झाली की, इयत्ता ५ वी नंतर हिंदी शिकवा. कोवळ्या वयात मुलांना मराठी लिपी आणि व्याकरण यांचा अदमास यायला पुरेसा वेळ मिळावा. मातृभाषेचा पाया घट्ट व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. एकाच वेळी त्यांच्यावर इंग्रजी आणि हिंदी या भाषांचे ओझे का ? एक भाषा शिकतांना दुसर्या भाषेतील फरक मुलांना गोंधळात पाडू शकेल, उदा. ‘इयत्ता’ म्हणावे कि कक्षा ? शिक्षा कि दंड ? विमान कि हवाई जहाज ? ससा कि खरगोश ? धनुष्य कि धनुष ? ‘उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदीला विरोध’ असा बालिश तर्क काढू नका.’’