आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.६.२०२५)

मरीन लाईन्स येथे आग


मुंबई – येथे मरीन लाईन्स परिसरात ‘मरीन चेंबर्स’ या इमारतीला २३ जून या दिवशी दुपारी १२.२६ वाजता मोठी आग लागली. पाचव्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. लाकडी साहित्य, वायरिंग, गॅस ट्यूब, गादी, छत आणि घरातील इतर वस्तूंमुळे आग पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चौघांची सुटका केली. या घटनेत कुणीही घायाळ झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.  आग लागण्याचे कारण कळू शकलेले नाही.


लोकलमधील मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे !

मुंबई – लोकलमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या २५ लोकलमध्ये ५० सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. आणखी १५ लोकलसाठी ३० यंत्रणा मागवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या २६ लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. एका लोकलमधील २ मोटरमन केबिनसाठी अंदाजे १.२४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अपघाती मृत्यूंची कारणे शोधता येत नसल्याने हे कॅमरे बसवण्यात आल्याचे समजते.