यापुढे धर्मांतरासारखे प्रकार झाल्यास हिंदु समाजाकडून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

सांगलीतील ऋतुजा राजगे आत्महत्येच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची वाहनफेरी

कोल्हापूर, २३ जून (वार्ता.) – सांगलीतील ऋतुजा सुकुमार राजगे हिने ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. राज्यात अनेक ठिकाणी हिंदु भगिनी धर्मांतराला बळी पडत आहेत. ख्रिस्ती पाद्र्यांकडून आमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. तरी येणार्‍या पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. हिंदु समाज आता शांत बसणार नाही. यापुढे धर्मांतरासारखे प्रकार झाल्यास हिंदु समाजाकडून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले जाईल आणि त्यात माता-भगिनींचा पुढाकार असेल, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांनी दिली.

ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वाहनफेरी काढून जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

राजारामपुरी येथील बाईचा पुतळा येथून वाहनफेरीला प्रारंभ होऊन शहरातील विविध मार्गांवरून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर फेरीची सांगता झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदार स्वप्नील पवार यांनी निवेदन स्वीकारले.

या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेच्या मातृशक्ती संघटनेच्या वंदनाताई बंबलवाड, आरोग्य भारतीच्या डॉ. अश्विनी माळकर, ‘धर्मजागरण’चे श्री. सचिन पोवार, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, मराठा तितुका मेळावावाचे श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. सोहम कुराडे आणि श्री. अक्षय ओतारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, श्री. संदीप सासणे, श्री. संताजीबाबा घोरपडे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी काढलेली वाहनफेरी

या फेरीमध्ये ‘हिंदूंचे धर्मांतरण थांबवा’, ‘ख्रिश्चन पास्टरसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी’, ‘प्राण सोडला पण हिंदु धर्म नाही सोडला’, ‘महाराष्ट्र सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर लागू करावा’, अशा आशयाचे फलक हिंदुत्वनिष्ठांनी हातात धरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

विविध ठिकाणची धर्मांतराची वाढती प्रकरणे लक्षात घेता आता राज्य सरकारने धर्मांतरविरोधी कठोर कायदा बनवणे अत्यावश्यक !