आटपाडी (सांगली) येथे मुलीला ‘नीट’च्या सराव परीक्षेत अल्प गुण मिळाल्यामुळे वडिलांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू !

  • अतीअपेक्षा आणि रागावर नियंत्रण मिळवता न येण्याचा परिणाम !

  • वडिलांना अटक

सांगली – जिल्ह्यात ‘नीट’च्या (वैद्यकीय शाखांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रतेच्या) सराव परीक्षेत अल्प गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी बेदम मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. आरोपी वडील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. २१ जूनच्या रात्री आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपी धोंडीराम भोसले हे मुलीला ‘नीट’च्या सराव परीक्षेत अल्प गुण मिळाल्यामुळे नाराज होते. अल्प गुण मिळाल्यामुळे वडील आणि मुलगी यांच्यात वाद झाला. त्यानंतर वडिलांनी तिला मारहाण केली. यामध्ये मुलगी गंभीर घायाळ झाली होती. दुसर्‍या दिवशी मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिला सांगली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू शरिरावर विविध ठिकाणी झालेल्या जखमांमुळे झाला आहे, असे आटपाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले.