मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा ! – महेश रोकडे, मुख्याधिकारी

शहरात फिरणारी मोकाट जनावरे आणि नगर परिषदेने पकडलेली जनावरे

पंढरपूर – पंढरपूर शहरात आषाढीच्या निमित्ताने विविध भागांतून लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. शहरात आणि उपनगरांत सर्वत्र गाय, बैल, म्हैस आणि गाढव अशी जनावरे मोकाट फिरत असतात. ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी उधळल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेने काही मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस दिली आहे, तसेच काही जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवले आहे. तरी वारीच्या काळात मोकाट जनावरांच्या मालकांनी जनावरांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन  मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

जनावरांचे जे मालक कोंडवाड्याचे शुल्क देणार नाहीत, त्या जनावरांचा लिलाव करण्यात येईल किंवा सदरचे गोवंश गोशाळेकडे देण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यशासनाने एकदाच वापरण्याच्या प्लास्टिकवर बंदी घोषित केली आहे. त्यानुसार पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरात ही मोहीम चालू केली आहे. शहरातील नागरिक, आस्थापने यांनी अशा प्लास्टिकपासून बनवलेली ताटे, वाट्या, चमचे, पिशव्या यांचा वापर करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.